बीड : बीड जिल्ह्यातील खासगी शाळांमधील कथित गैरप्रकार आणि विद्यार्थीसंख्येच्या नोंदीबाबत समोर येणाऱ्या तक्रारीची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतली आहे. संचमान्यता मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखविणे, प्रवेश नोंदींमधील अनियमितता आणि विद्यार्थ्यांच्या दाखल्यांबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची आता प्रत्यक्ष तपासणी केली जाणार आहे.
जिल्ह्यातील खाजगी शाळांची अचानक भेट देऊन स्वतंत्र पथकांमार्फत अभिलेखांची पडताळणी करण्यात येणार असून, वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयाच्या सखोल चौकशीसाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी 'दैनिक पुढारी'शी बोलताना दिली.
खाजगी शाळांमधील विद्यार्थीसंख्या, प्रवेश प्रक्रिया आणि संचमान्यतेसाठी सादर करण्यात येणाऱ्या कागदपत्रांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे. शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, दाखले आणि इतर संबंधित अभिलेख तपासले जाणार आहेत. केवळ कागदोपत्री माहितीवर अवलंबून न राहता प्रत्यक्ष शाळेत जाऊन नोंदींची पडताळणी करण्यावर शिक्षण विभागाने भर दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खाजगी शाळांमधील कारभाराची तपासणी अधिक काटेकोर होण्याची शक्यता आहे.
बीड शहरातील चंपावती विद्यालयात विद्यार्थीसंख्येशी संबंधित कथित खरेदी-विक्रीचा प्रकार समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रातील या प्रकारांबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयातील कथित अनियमिततेची मुद्दा पुढे आला. या प्रकरणात सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे प्रियाराणी पाटील यांनी स्पष्ट केले.
संचमान्यतेसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढवून दाखविण्याच्या उद्देशाने काही ठिकाणी मध्यस्थांमार्फत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची देवाणघेवाण होत असल्याचे आरोप समोर आले आहेत. छत्रपती संभाजीनगर येथील काही मध्यस्थ आणि बीड जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे. माजलगाव, परळी, धारूर, वडवणी, आष्टी आणि पाटोदा तालुक्यांतील काही संस्थांबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र, या आरोपांची अधिकृत चौकशीतून पडताळणी होणे आवश्यक आहे.
प्रस्तावित तपासणीमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज, शाळा सोडल्याचे दाखले, प्रवेश नोंदवही आणि विद्यार्थ्यांच्या संख्येशी संबंधित अन्य कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे. शाळेच्या अभिलेखांतील नोंदी आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांची पडताळणी करून अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. अचानक तपासणी होणार असल्याने संबंधित शाळांच्या अभिलेखांची विश्वासार्हता आणि प्रवेश प्रक्रियेची पारदर्शकता महत्त्वाची ठरणार आहे.
जिल्ह्यातील शिक्षण विभागासमोर विविध प्रकारच्या तक्रारी येत असताना केवळ चौकशीचे आदेश देऊन न थांबता त्यांचा निष्कर्ष वेळेत जाहीर करणे आणि दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित नोंदींमध्ये अनियमितता आढळल्यास त्याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवरील विश्वासावर होऊ शकतो. त्यामुळे या तपासणीतून नेमके काय निष्पन्न होते, याकडे शैक्षणिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
शिक्षणाधिकारी प्रिया राणी पाटील यांची भूमिका
जिल्ह्यातील खासगी शाळांची स्वतंत्र पथकांमार्फत प्रत्यक्ष तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीदरम्यान विद्यार्थ्यांचे दाखले, प्रवेश अर्ज आणि इतर संबंधित अभिलेखांची पडताळणी केली जाईल. तपासणीसाठी शाळांना अचानक भेटी दिल्या जाणार आहेत. कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयाच्या प्रकरणातही विशेष अधिकाऱ्यामार्फत सखोल चौकशी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे शिक्षणाधिकारी प्रियाराणी पाटील यांनी सांगितले.
दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला यश; कारवाईकडे लक्ष
बीड जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील कथित गैरप्रकार, विद्यार्थ्यांच्या नोंदी आणि संस्थांच्या कारभाराबाबत *दैनिक पुढारी*ने सातत्याने प्रश्न उपस्थित केले आहेत. चंपावती विद्यालयातील कथित विद्यार्थी खरेदी-विक्रीचा प्रकार आणि त्यानंतर कुप्पा येथील राजेसाहेब विद्यालयाबाबत समोर आलेल्या प्रकरणामुळे या विषयाची व्याप्ती पुन्हा चर्चेत आली. या प्रश्नांचा पाठपुरावा झाल्यानंतर शिक्षण विभागाने प्रत्यक्ष तपासणी आणि विशेष अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची भूमिका घेतल्याने वृत्तांकनातून उपस्थित केलेल्या मुद्द्यांना प्रशासकीय पातळीवर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. मात्र, तपासणी पूर्ण होऊन निष्कर्ष आणि कारवाई समोर आल्यानंतरच या प्रयत्नांचे अंतिम फलित स्पष्ट होणार आहे.