Beed News : घुले हत्या प्रकरणावरून बीडचे राजकारण तापले; मुंडे-सोनवणे आमनेसामने file photo
बीड

Beed News : घुले हत्या प्रकरणावरून बीडचे राजकारण तापले; मुंडे-सोनवणे आमनेसामने

मुंडेच्या आरोपांवर खासदार सोनवणेंचा पलटवार; मुलांवर राजकीय सूडातून चिखलफेक

पुढारी वृत्तसेवा

Beed politics heats up over Ghule murder case; Munde and Sonawane face off

बीड, पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्याप्रकरणाचा सोपविण्यात आल्यानंतर या प्रकरणाला आता राजकीय रंग चढला असून कधी काळी मित्र असलेल्या दोन प्रभावशाली नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची जोरदार फेरी सुरू झाली आहे. माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विधानसभेत या प्रकरणाचा उल्लेख करत खासदार बजरंग सोनवणे व त्यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधल्यानंतर खासदार सोनवणे यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार पलटवार केला.

पत्रकारांशी बोलताना खासदार सोनवणे म्हणाले की, "माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाणीवपूर्वक सभागृहात या विषयाचा उल्लेख करून माझी आणि माझ्या मुलांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. माझी मुले अत्यंत चांगल्या संस्कारात वाढलेली आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नाही. रात्रीची बार संस्कृती काय असते हेही त्यांना माहिती नाही. ड्रग्स सारख्या गोष्टींशी त्यांचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. केवळ राजकीय हेतूने त्यांच्यावर संशयाचे सावट निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे," असा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विलास घुले हत्याप्रकरणात मृताच्या भावाने दिलेल्या पुरवणी जबाबात सौरभ सोनवणे यांचे नाव आल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. या पार्श्वभूमीवर एसआयटीकडून तांत्रिक पुरावे, सीडीआर, लोकेशन आणि इतर बाबींची सखोल चौकशी सुरू होणार आहे. त्यामुळे एका बाजूला तपासाची दिशा महत्त्वाची ठरणार असताना दुसऱ्या बाजूला मुंडे-सोनवणे संघर्षामुळे या प्रकरणाचे राजकीय तापमानही चांगलेच वाढले आहे.

विलास घुले हत्याप्रकरणाचा तपास, पुरवणी जबाबातील आरोप आणि त्यानंतर सुरू झालेली राजकीय शाब्दिक चकमक यामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. येत्या काही दिवसांत या आरोप-प्रत्यारोपांची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

आ. धनंजय मुंडे यांच्यावर टीका

यावेळी सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर वैयक्तिक टीकाही केली. "इतरांवर बोट दाखवण्यापूर्वी स्वतःच्या चारित्र्याचा आणि कुटुंबाचा आरसा पाहावा. केवळ राजकीय सूडबुद्धीतून आणि जुन्या प्रकरणांचा राग मनात ठेवून माझ्या कुटुंबाला लक्ष्य केले जात आहे," असा आरोप त्यांनी केला.

सत्य बाहेर यावे हीच आमची भूमिका : खा. सोनवणे

विलास घुले हत्याप्रकरणाशी आपला किंवा आपल्या कुटुंबातील कोणाचाही संबंध नसल्याचा पुनरुच्चार करत सोनवणे म्हणाले, "या प्रकरणातील सर्व पुरावे, सीडीआर, सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि इतर बाबींची सखोल पडताळणी करावी. आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. सत्य बाहेर यावे हीच आमची भूमिका आहे. मात्र एखाद्या दुर्दैवी घटनेचा वापर करून घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT