थोरल्या पवारांच्या शिलेदारांवर दादांची नजर ! File Photo
बीड

थोरल्या पवारांच्या शिलेदारांवर दादांची नजर !

आ.क्षीरसागर, खा. सोनवणेंच्या भेटी वाढल्या

पुढारी वृत्तसेवा

Beed Political News

उदय नागरगोजे

बीड, पुढारी वृत्तसेवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडतांना खा. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांच्यासोबत राहिलेले आ. संदिप क्षीरसागर व खा. बजरंग सोनवणे यांच्यावर पालकमंत्री अजित पवार यांचे विशेष लक्ष असल्याचे दिसते. गत काही दिवसात हे तिघे वेगवेगळ्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येतांना दिसत असून यामुळे जिल्ह्यात चर्चेला ऊत आला आहे.

बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची सुत्र अजित पवार यांनी हाती घेतल्यापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. बीडच्या विकासाबरोबरच अजित पवार यांनी आपल्या पक्षाचे संघटन मजबुत करण्यासाठीही पालकमंत्री पदाचा उपयोग केला, हे गेल्या काही काळात झालेल्या पक्षप्रवेशांवरुन दिसून येते.

दादांची रोखठोक कार्यशैली बीडच्या जनतेला तर भावली आहेच, मग विर-ोधी पक्षातील नेते तरी याला अपवाद कसे ठरतील? असा प्रश्न निर्माण होतोय. तसे पाहिले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट पडले तेव्हा बीडमधील आ. संदिप क्षीरसागर वगळता इतर सर्व प्रमुख नेत्यांनी अजितदादांबरोबर राहणे पसंत केले होते. परंतु आ. क्षीरसागरांनी मात्र वेगळी वाट निवडत स्वतःचे अस्तित्व सिद्ध केले.

त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत ते विजयही झाले. दरम्यानच्या काळात बीडमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे पालकमंत्रीपद थेट अजित पवार यांनी स्विकारले. यामुळे बीडमध्ये विकासकामांना वेग आला. याबद्दल अजित पवार यांचे बॅनर लावत संदिप क्षीरसागर यांनी आभार मानले होते. तसेच बीडच्या विकासाच्या प्रश्नांवर अनेकदा त्यांनी अजित पवार यांची भेटही घेतली होती. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणूकीत अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली बीडमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आली असली तरी काही नगर सेवकांची गरज राष्ट्रवादीला पडणार आहे.

स्थितीत दोन वेळेस आ. संदिप क्षीरसागर यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याने वेगळ्याच चर्चा होऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे लोकसभा निवडणूकीवेळी अजित पवार गटातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या बजरंग सोनवणे यांनी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. यानंतरच्या पालकमंत्रीपदी अजित पवार विराजमान झाल्यानंतरपासून खा. सोनवणे यांच्याही पवारांशी भेटीगाठी वाढल्या आहेत.

पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बीडमध्ये विविध विकासकामांचे भुमिपुजन झाले, त्या कार्यक्रमाला खा. सोनवणे उपस्थित होते. हा कार्यक्रम झाल्यानंतर पवारांसोबत हेलीकॉप्टरने ते पुण्याला देखील गेले, याचे छायाचित्र चर्चेचा विषय ठरले असून खा. शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आ. संदिप क्षीरसागर व खा. बजरंग सोनवणे यांच्यावर विशेष लक्ष अजित पवारांचे असल्याचे या निमित्ताने दिसून आले आहे. एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची चर्चा होत असतांना या दोन्ही नेत्यांची वाढलेली जवळीक जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे.

आ. धनंजय मुंडेंची अनुपस्थिती !

बीडमध्ये झालेल्या कार्यक्रमावेळी आ. धनंजय मुंडे हे अनुपस्थित होते. पालकमंत्र्यांचा दौरा अचानक ठरला, पूर्वनियोजीत कार्यक्रमामुळे ते या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकत नसल्याने त्यांनी समाज माध्यमातून पोस्ट केली होती. तसेच माझ्या अनुपस्थितीचा वेगळा अर्थ काढू नये असे देखील म्हटले होते. यानंतर अजित पवार यांनी देखील जाहीर भाषणातून आमचं सगळं चांगलं चाललंय असे म्हटले होते. असे असले तरी ज्या ज्या वेळी अजित पवार जिल्ह्यात येतात, त्या त्या वेळच्या कार्यक्रमात आ. मुंडे उपस्थित नसतात, हे गत काही दिवसांपासून वारंवार घडत असल्याने चर्चा होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT