Beed Police's 'Deep Eye AI' will become a model for the entire state
बीड, पुढारी वृत्तसेवा : गुन्हे तपास अधिक वेगवान, अचूक आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्याच्या दिशेने बीड पोलिसांनी विकसित केलेल्या 'डीपआय एआय (DeepEye AI)' या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तपास प्रणालीने राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीची प्रशंसा मिळवली आहे. पोलीस तपास प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातील आधुनिक पोलिसिंगसाठी नवा मापदंड ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यासाठी नुकतीच राज्यस्तरीय समिती बीडमध्ये दाखल झाली होती. ही समिती आपला अहवाल वरिष्ठांना सादर करणार आहे.
या प्रकल्पाअंतर्गत गुन्हेगारांचा डिजिटल गुन्हेगारी इतिहास, हिस्ट्रीशीटर, गुंडा रजिस्टरमधील आरोपींची माहिती तसेच संघटित गुन्हेगारीच्या हालचालींचे विश्लेषण करणारी प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीच्या साहाय्याने एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाईसाठी पात्र प्रकरणे तसेच मोक्का अंतर्गत तपासाची आवश्यकता असलेल्या टोळ्या आणि आरोपींची संभाव्य प्रकरणे स्वयंचलितपणे ओळखणे शक्य होणार आहे.
प्रणालीमध्ये Preventive Action Chart, Criminal Antecedent Search आणि Multi-Accused Role Analysis यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोपींचा गुन्हेगारी इतिहास, गुन्ह्यातील भूमिका आणि संघटित गुन्हेगारीशी असलेले संबंध तपास अधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. याशिवाय, बीड जिल्ह्यात २०१७ पासून नोंदविण्यात आलेले सर्व एफआयआर आणि ८०० हून अधिक आरोपपत्रांचा (Charge Sheets) समावेश Al Knowledge Base मध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे तपास नियोजन, कागदपत्रांची निर्मिती, कायदेशीर विश्लेषण आणि निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रभावी सहाय्य मिळणार आहे.
या प्रकल्पात एफएसएल, दूरसंचार सेवा पुरवठादार, बँका आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी स्वयंचलित अधिकृत पत्रनिर्मिती, लाईव्ह लोकेशन सहाय्य, गुन्हेगारी नमुना विश्लेषण, पुरावा व्यवस्थापन, ऑन-साइट डेटा संरक्षण, ई-कोर्ट समन्वय, समान न्यायनिर्णयांचे विश्लेषण आणि सुरक्षित डेटा साठवण अशा अनेक अत्याधुनिक सुविधांचाही समावेश करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय तज्ज्ञ समितीने या प्रकल्पाचे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, कायदेशीर सुसंगती, डेटा सुरक्षा, वापरातील सुलभता आणि तपासातील उपयुक्तता या निकषांवर सखोल मूल्यमापन केले. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकानंतर समितीने DeepEye Al च्या नाविन्यपूर्ण संकल्पनेचे विशेष कौतुक करत, ६५ चाचणी प्रकरणांमधील (Test Cases) तांत्रिक क्षमता आणि तपासातील परिणामकारकत बाबत सकारात्मक अभिप्राय नोंदविला.
एफआयआर नोंदणीपासून एआय सहाय्यित तपास, पुरावा व्यवस्थापन, केस डायरी, आरोपपत्र, वरिष्ठ अधि-काऱ्यांकडून थेट देखरेख आणि न्यायालयीन खटल्याच्या निरीक्षणा-पर्यंत संपूर्ण तपास प्रक्रिया डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित करण्याची क्षमता या प्रणालीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या यशस्वी Proof of Con-cept (POC) नंतर राज्यभर या प्रणालीच्या अंमलबजावणीचा मार्ग अधिक सुकर झाल्याचे मानले जात आहे. भविष्यात देशातील इतर पोलीस दलांसाठीही DeepEye Al ही आधुनिक, तंत्रज्ञानाधिष्ठित तपास प्रणालीचा आदर्श ठरू शकते, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.