

Police to Now Use 'AI' for Crime Investigation!
बीड, पुढारी वृत्तसेवा : बदलत्या काळात गुन्हे तपासासाठी पोलिसांना एआय तंत्रज्ञानाची मदत व्हावी या उद्देशाने पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्या संकल्पनेतून 'डीप आय' हे अद्ययावत सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. ऑनलाईन पद्धतीने कार्यरत राहणारी ही प्रणाली गुन्हा दाखल झाल्यापासून ते केसच्या ट्रायलपर्यंतची सर्व माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून सादर करणार आहे. याबरोबरच तपासातील लूप होल्सदेखील संबंधित अधिकाऱ्याला निदर्शनास आणून देत परिपूर्ण तपासाकरिता मदत करणार असल्याचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी सांगितले.
बीड पोलिस दलाच्या वतीने विकसीत करण्यात आलेले 'डीप आय' ही एफआयआर नोंदणीपासून ते थेट न्यायालयात आरोपपत्र सादर करेपर्यंतची संपूर्ण तपास प्रक्रिया डिजिटल आणि एकात्मिक पद्धतीने हाताळणारी 'एन्ड टू एन्ड एआय' सक्षम प्रणाली आहे. या प्रणालीमुळे पोलिस ठाण्यांमधील सध्या वापरात असलेली ३० पेक्षा अधिक पारंपरिक भौतिक रजिस्टर्स बंद होणार असून, सर्व माहिती आता केवळ एका 'क्लिक'वर उपलब्ध होणार आहे.
ही प्रणाली आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्ही मोबाइल प्लॅटफॉर्मवर अॅप स्वरूपात, तसेच अधिकृत वेबसाइटवरही उपलब्ध करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये समाविष्ट असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने एफआयआरचे स्वयंचलित विश्लेषण केले जाणार आहे. गुन्हा घडल्यानंतर संबंधित कायद्यांची कलमे सुचविणे, गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्या अट्टल आरोपींची ओळख पटवणे आणि गुन्हेगारीच्या पद्धतींचे अचूक विश्लेषण करणे या प्रणालीमुळे शक्य होणार आहे.
एखाद्या विशिष्ट भागात गुन्ह्यांमध्ये अचानक वाढ झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ 'अलर्ट' मिळतील. त्यासोबतच संवेदनशील भागांत गस्त वाढवणे किंवा महिला सुरक्षेशी संबंधित गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करणे, यासारख्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे मार्गदर्शनही ही प्रणाली करणार आहे. माध्यमातून महिलांसाठी असुरक्षित असलेल्या क्षेत्रांची ओळख पटवून 'प्रतिबंधात्मक पोलिसिंग' अधिक प्रभावी केले जाईल.
एफआयआर' आणि उच्चस्तरीय सुरक्षा
नागरिकांच्या सुविधेसाठी या प्रणालीमध्ये 'इ एफआयआर' आणि आवाजावर आधारित एफआयआर नोंदणीची सुविधा देण्यात आली आहे. संपूर्ण डेटा सुरक्षित राहण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन यांसारख्या उच्चस्तरीय सायबर सुरक्षा उपायांचा अवलंब करण्यात आला आहे.
ज्ञान आणि अनुभवाचा सुरेख संगम !
एखाद्या क्षेत्रात काम करत असताना त्यामध्ये येणाऱ्या अडचणी माहिती झालेल्या असतात, त्यावर तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाययोजना करताना दुसऱ्या कोणावर तरी अवलंबून रहावे लागते. परंतु बीडचे पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुरकी येथे विद्युत अभियांत्रिकी शाखेत बी. टेक. पूर्ण केलेले आहे. सन २०१२-१३ दरम्यान हैदराबाद येथे सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. तंत्रज्ञानाची परिपूर्ण माहिती आणि पोलिस दलातील अनुभव याचा सुरेख संगम साधत 'डीप आय' ही प्रणाली विकसित केली आहे.