बीड ः बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात पोलिसांनी दिवसभर धडक कारवाया केल्या. या मोहिमेत पोलिसांनी चार मटका-जुगार अड्ड्यांवर छापे टाकत पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दारूसाठा, वाहने, लॅपटॉप आणि रोख रकमेसह तब्बल 3 लाख 21 हजार 120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाजीनगर ठाण्याचे प्रमुख बदलताच अवैध धंद्यांवर कारवाई झाल्याने, हे अवैध धंदे यापूर्वीही चालत असताना कारवाई का झाली नाही? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली 27 मे रोजी विशेष धाडसत्र राबविण्यात आले. या मोहिमेतील सर्वात मोठी कारवाई इंदिरानगर परिसरातील नाट्यगृहाजवळ करण्यात आली. बकरी ईदनिमित्त शासनाने ‘ड्राय डे’ घोषित केला असताना चढ्या दराने चोरटी दारू विक्री करण्यासाठी मोठा साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार रात्री पोलिसांनी पत्र्याच्या शेडवर छापा टाकून 12 बॉक्समधील तब्बल 1 हजार 200 देशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या.
याप्रकरणी आकाश सदाशिव वडमारे (रा. इंदिरानगर, बीड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याशिवाय नगर नाका परिसरातील हॉटेल ऑलिव्हसमोर अमीर खान नादेरखान पठाण याला, तर लाईफ लाईन हॉस्पिटल कॅनाल रोड परिसरातून शेख हुजेर शेख रियाज याला ‘कल्याण’ मटका जुगार चालविताना अटक करण्यात आली. या दोघांकडून अनुक्रमे 1 लाख 10 हजार 440 रुपये आणि 1 लाख 8 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात स्प्लेंडर प्लस आणि ॲक्सेस स्कूटरचा समावेश आहे.
नगर रोडवरील जायका हॉटेलजवळ मटका आकडे लिहिताना शेख युसुफ शेख नझीर (रा. बालेपीर, बीड) याला 42 हजार 720 रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. तसेच पालवन चौकातील हॉटेल डी-राजसमोरील पत्र्याच्या शेडमध्ये ऑनलाइन ‘चक्री’ जुगार खेळवित असलेल्या लक्ष्मण आबा पवार (वय 29, रा. गोविंदनगर, बीड) याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एचपी कंपनीचा लॅपटॉप, की-बोर्ड, माउससह 54 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.ही कारवाई पोलिस निरीक्षक बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सागर सोत्रे व त्यांच्या पथकाने केली.
अवैध धंद्यांवर पांघरूण कोण घालत होते?
बीड जिल्हा पोलिस दलातील अनेक पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. यामध्ये शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे प्रमुख देखील बदलण्यात आले आहेत. नव्याने पदभार स्वीकारताच शीतलकुमार बल्लाळ यांनी पोलिस ठाणे हद्दीत आपल्या एंट्रीची माहिती पोहचवण्यासाठी जोरदार मोहीम उघडली आहे. यामध्ये अवैध दारू विक्री, मटका अड्ड्यावर धाड टाकण्यात आली. बल्लाळ यांची एंंट्री होताच एवढ्या मोठ्या प्रमाणात कारवाया झाल्या, तर मग यापूर्वी या सर्व अवैध धंद्यांवर पांघरुण कोण घालत होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अशाच पद्धतीने इतर पोलिस ठाण्याच्या हद्दीत देखील आता कारवायांचे सत्र सुरू होणार असल्याचे दिसते.