बीड : दिवसा गावात फिरून बंद घरांची रेकी करायची आणि रात्री घरफोडी करून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारणार्या आंतरजिल्हा घरफोडी टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे पाच लाख रुपये किमतीचे तीन तोळे सोने व दहा भार चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे पिंपळनेर व वडवणी पोलीस ठाण्यातील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
11 जुलै 2026 रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घराचा दरवाजा उघडा दिसल्याने घरमालकाने पाहणी केली असता घरातील कपाट फोडून सोन्याचे दागिने चोरीस गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे कृष्णा शोभेराव राठोड (वय 25, रा. अंबुनाईक तांडा, गेवराई) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. तसेच वडवणी तालुक्यातील खापरवाडी तांड्यातील घरफोडीचीही कबुली दिली. आरोपीने आणखी पाच साथीदारांसह गुन्हे केल्याचे सांगितले असून उर्वरित आरोपी फरार आहेत.
आरोपीकडून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल व आरोपीला पुढील तपासासाठी पिंपळनेर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शरद पवार करीत आहेत.
पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शिवाजी बेंटेवाड, उपनिरीक्षक शेखर औटे, महेश विघ्ने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.