Beed Crime News
जोडवाडी येथे सुनेच्या मृत्यूनंतर सासूचाही मृत्यू  Pudhri News Network
बीड

Beed Crime News : विषारी औषध पाजून सुनेचा खून; सासूचाही संशयास्पद मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

फुलसांगवी : लग्नामध्ये ५ लाख रुपये हुंडा व लग्नातील मान पान न दिल्याच्या कारणावरून सुनेला विषारी औषध पाजून पती व सासू व सासऱ्याने सुनेचा खून केल्याची घटना रविवार (दि.१४ ) सायंकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली होती. सुनेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन होण्याच्या आतच सासूचाही संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.१५ ) उघडकीस आली. सुनेचा खून व १२ तासाच्या आतच सासूचाही संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

अंबड तालुक्यातील दहीपुरी या गावातील प्रतीक्षाचा चार वर्षांपूर्वी गेवराई तालुक्यातील जोडवाडी या गावात संदीप सखाराम कोकाटे यांच्याशी विवाह झाला होता. या विवाहानंतर सासू कुंता सखाराम कोकाटे, सासरा सेवानिवृत्त शिक्षक सखाराम उत्तमराव कोकाटे, नवरा डॉ. संदीप सखाराम कोकाटे यांच्याकडून पाच लाख रुपये हुंडा व लग्नातील मानपान यासाठी छळ होऊ लागला.

हुंडा न दिल्याने सुनेचा विषारी औषध पाजून खून (Beed Crime)

'तुझ्या आई-वडिलांकडून पैसे का आणत नाहीस' असे म्हणून तिला रविवार ( दि. 14) जबरदस्तीने विषारी औषध पाजण्यात आले. व प्रतीक्षाने विषारी औषध पिऊन जीवन संपविल्याचा बनाव केल्याचा बोभाटा केला. प्रतीक्षाला उपचारासाठी बीडच्या रुग्णालयाकडे घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

सुनेच्या मृत्यूनंतर सासूचाही धक्कादायक मृत्यू (Beed Crime)

प्रतीक्षेच्या मृतदेहावर शवविच्छेदन होण्यापूर्वीच सासू कुंता सखाराम कोकाटे या महिलेचाही राहत्या घरामध्ये संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना सोमवार (दि. 15) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. सून प्रतीक्षा कोकाटे हिचा भाऊ हर्षद संतोष कळंबे यांच्या फिर्यादीवरून आरोपी नवरा संदीप कोकाटे, सासरा सखाराम कोकाटे व मयत सासू कुंता कोकाटे या तिघांच्या विरोधात सुनेला विषारी औषध पाजून तिची हत्या केल्याच्या आरोपाखाली चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तर इकडे सासू कुंता कोकाटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गेवराईचे पोलीस उपअधीक्षक नीरज राजपूत यांनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र हलवली आहेत.

यावेळी चकलांबा पोलीस स्टेशनचे सपोनी. नारायण एकसिंगे यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सासू कुंती कोकाटे यांच्या मृतदेहाचे रात्री उशिरापर्यंत शव विच्छेदन न झाल्यामुळे सायंकाळी आठ वाजेपर्यंत अंत्यविधीही झाला नव्हता.

SCROLL FOR NEXT