Mengdewadi village road Issues
नेकनूर : देशाला स्वातंत्र्य मिळून नुकतेच ७९ वर्षे पूर्ण झाली. मात्र अजूनही ग्रामीण भागातील अनेक गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. पाटोदा तालुक्यातील वाघिरा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मेंगडेवाडी गावाला आजतागायत डांबरी रस्ता मिळालेला नाही. त्यामुळे येथील ग्रामस्थांना दररोज हाल सहन करावे लागत आहेत.
ग्रामस्थांनी वारंवार लोकप्रतिनिधींपासून मंत्र्यांपर्यंत किमान रस्त्याची तरी सोय करावी अशी मागणी केली. यासाठी त्यांनी जलसमाधी आंदोलन, रास्ता रोको आंदोलन देखील केले. परंतु केवळ आश्वासनांचे गाजर दाखवले गेले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून ते आता मोठ्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
मेंगडेवाडी ते वाघिरा या रस्त्याची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. रस्ता नसल्याने एस.टी. बससेवा येथे पोहोचत नाही. पावसाळ्यात गावकऱ्यांना दूध-दुभते विक्रीसाठी, बाजारहाट, दवाखाना, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तलावाच्या सांडव्यातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. पालक दररोज आपल्या लेकरांच्या जीवावर उदार होऊन शाळेत पाठवतात.
रस्त्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी विष्णु बांगर, मल्हारी आरगुडे, रामेश्वर शिंदे, छत्रभुज रांजवण, राजेभाऊ कदम, जगन्नाथ बोबडे, कृष्णा जगदाळे, श्रीहरी आरगुडे, दिलीप जाधव, यश बांगर आदी ग्रामस्थांनी केली आहे.
अहमदपूर-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गापासून फक्त ७ किमी अंतरावर असूनही रस्त्याच्या अभावामुळे ९०० लोकसंख्या असलेल्या गावाला दरवर्षी संकटांना सामोरे जावे लागते. इयत्ता १ ते ४ थी पर्यंत शाळा गावात आहे, मात्र पुढील शिक्षणासाठी वाघिरा, लिंबागणेश, भायाळा येथे जाण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे पालक व विद्यार्थी अक्षरशः वेठीस धरले गेले आहेत. लवकरच राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन उभारले जाईल, असा इशारा डॉ. गणेश ढवळे यांनी दिला.