ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा पाटोद्यात विवाह; चार जणांवर गुन्हा (Pudhari File Photo)
बीड

Beed News : ठाणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीचा पाटोद्यात विवाह; चार जणांवर गुन्हा

पडघा पोलिस ठाण्यात बालविवाह, अॅट्रॉसिटी तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बीड : ठाणे जिल्ह्यातील एका पंधरा वर्षीय मुलीचा विवाह पाटोदा तालुक्यातील उंबरविहीरा येथील व्यक्तीशी २७फेब्रुवारी रोजी लावण्यात आला. या प्रकरणात ठाणे जिल्ह्यातील पडघा पोलिस ठाण्यात पाटोदा व आष्टीतील चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाऊसाहेब तांबे (रा. उंबरविहीरा, ता. पाटोदा), गोवर्धन महाराज (चिंचपूर), अंबादास मोरे (कारखेल, ता. आष्टी), विलास हिलम (नांदीठाणे, बागपाडा, भिवंडी, पडघा, ठाणे) व इतर नातेवाईक यांच्या विरोधात ठाणे ग्रामीण अंतर्गत असलेल्या पडघा पोलिस ठाण्यात बालविवाह, अॅट्रॉसिटी तसेच पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलगी तिच्या काका-काकीकडे राहते. यावेळी तिच्या ओळखीच्या विलास हिलम हा त्यांच्या घरी आला व त्याने मुलीच्या लग्नासाठी मुलगा बघितला आहे असे सांगितले. यावर या मुलीच्या काका-काकींनी त्यास होकार दिला. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी विलास हिलम हा इतर काहीजणांना घेऊन महाप (पाच्छापूर, ता. भिवंडी, जि.ठाणे) येथे आला व या अल्पवयीन मुलीला घेऊन गेला.

रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण आष्टी तालुक्यातील चिंचपूर येथे गोवर्धन महाराज यांच्या घरी पोहचले. त्या ठिकाणी विलास हिलम, गोवर्धन महाराज व अंबादास मोरे यांनी या मुलीची ओळख भाऊसाहेब शांतीलाल तांबे याच्याशी करून दिली व त्याच्याशीच तुझे लग्न होणार असल्याचे सांगितले. परंतु तांबे याचे वय जास्त असल्याने मुलीने लग्नास नकार दिला, परंतु त्यांनी तिला तिच्या कौटुंबिक अडचणींची माहिती देत लग्नास तयार होण्यासाठी दबाव टाकला. त्यानुसार गोवर्धन महाराज यांच्या घरी २७ फेब्रुवारी रोजी या अल्पवयीन मुलीचा विवाह भाऊसाहेब तांबे याच्याशी दहा ते पंधरा लोकांच्या उपस्थितीत झाला.

यानंतर तांबे याने या मुलीला आपल्या घरी नेले. तसेच आता तू माझी पत्नी आहेस असे सांगत शारीरिक संबंध ठेवले. यानंतर १० मार्च रोजी या मुलीचे नातेवाईक तिला भेटण्यासाठी आले असता मुलीने सोबत जाण्याविषयी सांगितले असता तांबे व त्याच्या नातेवाईकांनी याला विरोध केला.

यानंतर नातेवाईकांनी विलास हिलम याला त्या ठिकाणी ठेवून जोपर्यंत तुम्ही परत येणार नाही तोपर्यंत याला सोडणार नाही अशी अट घातली. यानंतर सदर मुलीने आपल्या गावी जात पोलिस ठाणे गाठत आता विलास हिलम, गोवर्धन महाराज, अंबादास मोरे, भाऊसाहेब तांबे व त्यांच्या नातेवाईकांविरोधात तक्रार दिली असून आता या प्रकरणात अधिक तपास पडघा पोलिस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT