Parli Vaijnath Thermal Power Station
परळी वैजनाथ: बीड जिल्ह्य़ातील परळी वैद्यनाथ येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक १ ते ५ च्या जागेत मेगा सोलर प्रकल्प उभारण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यात याठिकाणी ५० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेला सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्याची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केली आहे. या ठिकाणी एकूण 350 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीचा प्रस्ताव आहे.
परळी वैजनाथ येथे जुने व नवे औष्णिक विद्युत केंद्र म्हणून एकूण आठ संच कार्यरत होते. त्यापैकी जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संच कायमस्वरूपी बंद करून ते संपूर्णतः निष्काशीत करण्यात आलेले आहेत. सध्या नवीन औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण तीन संच सुरू आहेत. संच क्रमांक १ व २ हे १९८० सालचे असल्यामुळे त्यांचे आयुर्मान कालबाह्य़ झाल्याचे सांगत ते २०१० साली बंद करण्यात आले.
तर २०१५ मध्ये संच क्रमांक ३ बंद केला. कालांतराने हे संच अवसायानात काढण्यात आले. संच क्रमांक तीन, चार व पाच हे तीन संच 2019 पासून बंद करण्यात आले. त्यानंतर बंद करण्यात आलेले सर्व पाच संच निष्काशीत करण्यात आले आहेत. या ठिकाणची सर्व यंत्रसामग्री, अन्य संसाधने आदी सर्वही निष्काशीत करून जागा रिकामी करण्यात आलेली आहे.
परळी येथील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्कासित झालेल्या संच क्रमांक एक ते पाच च्या रिकाम्या जागेत 350 मेगा वॅट वीज निर्मितीची क्षमता असलेला सौर उर्जा प्रकल्प उभारण्यात यावा अशी मागणी मागील अधिवेशनात धनंजय मुंडे यांनी विधानसभेत केली होती.त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ती मागणी मान्य करून लवकरच सौर उर्जा प्रकल्प उभा करण्याचा शब्द दिला होता. या अनुषंगाने आता हा प्रकल्प उभा करण्याची कार्यवाही शासन स्तरावरून सुरु झाली आहे.
पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असलेल्या सौरउर्जा संचाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतची निविदा महानिर्मितीने प्रसिद्ध केल्याने लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार हे निश्चित झाले आहे.या सौर निर्मिती प्रकल्पाच्या उभारणीमुळे वीज निर्मितीसह परळी व परिसरात रोजगार निर्मिती देखील होणार असून हा प्रकल्प परळीच्या विकासात एक मैलाचा दगड ठरणार आहे.
दरम्यान, जुने औष्णिक विद्युत केंद्र हे परळी शहराजवळील बीड व गंगाखेड रस्त्यावरच होते. या परिसरातील एकूण 95 हेक्टर जमीन या औष्णिक विद्युत केंद्रासाठी आरक्षित करण्यात आलेली होती. या जागेवरच जुन्या औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण पाच संच उभे होते. या 95 हेक्टर रिकाम्या झालेल्या जमिनीवर आता तीनशे पन्नास मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभा करण्याचा प्रस्ताव असून यापैकी पहिल्या टप्प्यातील 50 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा संचाच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मागील अधिवेशनामध्ये आ. धनंजय मुंडे यांनी परळीच्या निष्काशीत झालेल्या औष्णिक विद्युत केंद्राच्या जागेवर मेगा सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्याची मागणी केली होती. सभागृहात यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाला मंजुरी देत असल्याचे सांगितले आणि आता पहिल्या टप्प्यात 50 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबद्दल आ. धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.