Parli Tehsildar Vyankatesh Munde  Pudhari
बीड

Beed Bribe | परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांंना लाच प्रकरणी अटक; नागरिकांचा तहसील परिसरात फटाके फोडून जल्लोष

बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Parli Tehsildar Vyankatesh Munde

परळी वैजनाथ: येथील तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाच प्रकरणात बीड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. कायम वादग्रस्त ठरलेल्या मुंडे यांच्याविरोधात दाखल झालेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराकडून ऐपत प्रमाणपत्र देण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाली होती. चर्चेनंतर २० हजार रुपयांत व्यवहार ठरल्याची माहिती समोर आली. या पार्श्वभूमीवर पथकाने तहसील कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराच्या हालचालींमुळे संशय आल्याने मुंडे यांनी प्रत्यक्ष लाच स्वीकारली नसली तरी तपासादरम्यान आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. चौकशीनंतर त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दरम्यान, मुंडे यांच्या कार्यकाळात यापूर्वीही विविध कारणांमुळे वाद निर्माण झाले होते. लोकसभा निवडणुकीच्या काळात खासदार बजरंग सोनवणे यांनी प्रशासनातील काही अधिकाऱ्यांवर आरोप करत मुंडे यांना निवडणूक कामकाजातून दूर करण्याची मागणी केली होती. तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही त्यांच्या बदलीची मागणी केली होती.

बोगस जन्म-मृत्यू प्रमाणपत्र प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही परळी तहसील कार्यालयातील कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. नागरिकांकडूनही त्यांच्या कार्यपद्धतीबाबत वेळोवेळी तक्रारी होत होत्या. अखेर लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

नागरिकांनी तहसील परिसरात फटाके फोडून केला जल्लोष

वादग्रस्त ठरलेले तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची माहिती कळाल्यानंतर काही नागरिक तहसील परिसरात जमा झाले. यातील काही नागरिकांनी येताना सोबत फटाके ही आणले होते. 'अतिशय योग्य झाले', 'ही कारवाई व्हायलाच पाहिजे होती' अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आनंद व्यक्त केला. या नागरिकांनी तहसील परिसरातच फटाके फोडून जल्लोष केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT