परळी तालुक्यातील धर्मापुरी शिवारातून ४९ किलो गांजा जप्त केला. Pudhari
बीड

Parli Ganja Seized | परळी तालुक्यात २९.५४ लाखांचा गांजा जप्त; दोघांना अटक

अहमदपूर–अंबाजोगाई मार्गावर सापळा रचून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

Parli Taluka Ganja Seizure

परळी : बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधातील मोहिमेत मोठी कारवाई करत परळी तालुक्यातील धर्मापुरी शिवारातून ४९ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजा आणि वाहनासह एकूण २९ लाख ५४ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आणखी दोन संशयितांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला धर्मापुरी शिवारातून लाल रंगाच्या कारमधून गांजाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी ग्रामीण पोलिसांच्या मदतीने अहमदपूर–अंबाजोगाई मार्गावर सापळा रचला. संशयित मारुती सुझुकी ब्रेझा कारची झडती घेतली असता त्यामध्ये ४९ किलो गांजा आढळून आला. पोलिसांनी गांजासह कार असा एकूण २९ लाख ५४ हजार १६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अनिल विठ्ठल फड (वय २५) आणि अरबाज युसुफ सय्यद (वय २३, दोघेही रा. धर्मापुरी, ता. परळी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अर्जुन रतनभाऊ फड आणि श्रीकांत भास्कर फड (दोघेही रा. धर्मापुरी) यांनी गांजाची वाहतूक करण्यासाठी मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२७/२०२६ नोंदविण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास परळी ग्रामीण पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कांवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतवळे यांच्या नेतृत्वाखाली हवालदार रामचंद्र केकान, मारोती कांबळे, विष्णु सानप, गोविंद भताने, गोविंद राख, विकास राठोड, पोलीस अंमलदार सचिन आंधळे, बबन सलगर, विकी सुरवसे, चालक अतुल हराळे, सुनील राठोड तसेच परळी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर, पोलीस उपनिरीक्षक निमोणे, पुजरवाड आणि पोलीस हवालदार वाले आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT