बीड

Child marriage prevented in Beed : पांगरी तांडा येथील १४ वर्षीय मुलीचा बालविवाह पोलिसांनी रोखला

मुलीच्या पालकांसह नातेवाईकांचे पोलिसांनी समुपदेशन केल्यानंतर कुटुंबीयांनी नियोजित विवाह रद्द करण्यास सहमती दर्शविली

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : परळी तालुक्यातील पांगरी तांडा येथे होणारा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह परळी ग्रामीण पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून रोखला. गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या तातडीच्या कारवाईमुळे नियोजित विवाह रद्द करण्यात आला.

परळी ग्रामीण पोलिसांना गुरुवारी (२ जुलै) दुपारी पांगरी तांडा येथे अल्पवयीन मुलीचा विवाह होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. शिवकर सोळंखे, पोहेकॉ. गजानन पुजरवाड आणि चापोहे. मुंडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक पोलीस पाटील तथा राज्यपाल पुरस्कारप्राप्त ज्ञानोबा (माऊली) मुंडे यांनाही या कारवाईत सहभागी करून संबंधित कुटुंबाची भेट घेण्यात आली.

सुरुवातीला मुलीच्या पालकांनी विवाहाबाबत टाळाटाळ केली. मात्र, विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर सायंकाळी विवाह होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी मुलीच्या जन्मतारखेची कागदपत्रे तपासली असता तिचे वय अवघे १४ वर्षे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर पोलिसांनी मुलीच्या पालकांसह नातेवाईकांचे समुपदेशन केले.

बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार मुलीचे वय १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वी विवाह करता येत नसल्याचे सांगून कायदेशीर परिणामांची माहिती देण्यात आली. समुपदेशनानंतर कुटुंबीयांनी नियोजित विवाह रद्द करण्यास सहमती दर्शविली. अल्पवयीन मुलीचा विवाह लगतच्या तांड्यातील २३ वर्षीय युवकासोबत होणार होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा बालविवाह रोखण्यात यश आले. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके-मेंढे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रविकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार शिवरकर यांच्या नेतृत्वात पोहेकॉ. गजानन पुजरवाड, चापोहे. मुंडे व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर पोकळे यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT