

धुळे : धुळे तालुक्यातील निकुंभे गावात किरकोळ कारणावरून एका शेतकऱ्याच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून त्याचा खून करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग (LCB) आणि सोनगीर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कामगिरी करत अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. दशरथ किसन ठाकरे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला धुळे तालुक्यातील मेहरगाव शिवारातील जंगलातून ताब्यात घेण्यात आले.
धुळे तालुक्यातील निकुंभे गावातील रहिवासी शानाभाऊ शंभू पाटील (वय ५०) या शेतकऱ्यासोबत आरोपी दशरथ किसन ठाकरे याने किरकोळ कारणावरून वाद घातला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी ठाकरे याने पाटील यांच्या डोक्यात लोखंडी सळईने (रॉड) जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले पाटील रक्ताच्या थारोळ्यात कोसळले, तर आरोपीने घटनास्थळावरून तातडीने पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेत पाटील यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. पाटील यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला.
या संवेदनशील गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा आणि सोनगीर पोलिसांची दोन पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे धुळे तालुक्यातील मेहरगाव येथील जंगलातून आरोपी दशरथ किसन ठाकरे याला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता, जुन्या वादातूनच हा खून केल्याची कबुली त्याने दिली आहे. अशाप्रकारे पोलिसांनी कौशल्याने तपास करत गुन्ह्यातील आरोपीला ४८ तासांच्या आत जेरबंद केले.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांभळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) तुषार देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि नामदेव सहारे, पोलीस उपनिरीक्षक (पोउनि) प्रशांत ताकाटे, पोउनि रविंद्र बागुल आणि पोलीस अंमलदार संजय बोरसे, राहुल सानप, आरीफ पठाण, अमरीश सानप, अमोल पाटील, अमोल जाधव, प्रदिप धिवरे, राहुल पाटील व रोहन वाघ यांच्या पथकाने केली आहे.