Beed OBC leader Laxman Hake News
बीड, पुढारी वृत्तसेवा: मनोज जरांगे म्हणतात ५८ लाख प्रमाणपत्र दिले गेलेत, दुसरीकडे सरकार म्हणते ओबीसींच्या आरक्षणाला घक्का लागणार नाही, खरं काय ते आम्हाला सांगा. दुर्दैवाने सत्तेत आणि विरोधात असलेले आमदार, खासदार, मंत्री या प्रश्नावर बोलायला तयार नाहीत. पण आमदार, खासदारकीचा रस्ता ओबीसींच्या गाव, वाडी, वस्तीतून जातो हे विसरू नका, ओबीसींच्या समतेचा हा रथ भल्याभल्यांना गारद केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला.
शनिवारी दुपारी बीड शहरातील चहाटा फाटा भागातील मंगल कार्यालयात ओबीसी समाज बांधवांची व्यापक बैठक पार पडली. यावेळी ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ बाघमारे यांच्यासह स्थानिक समन्वयकांची उपस्थिती होती यावेळी नवनाथ वाघमारे म्हणाले, आज अनेक आमदार मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे बॅनर लावत आहेत, स्थानिकचे अनेक नेते पाठिंब्याची घोषणा करत आहेत, हे सर्वजण येत्या निवडणुकांमध्ये तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या हक्कावर गदा आणणारे हे लोक निवडणुकीवेळी तुमच्याकडे येतील, तेव्हा तुम्ही त्यांना हे आजचे बॅनर दाखवा. आगामी निवडणुकीत उमेदवार कोणत्याही पक्षाचा असू द्या, ओबीसी निवडून आला पाहिजे, एवढे लक्षात ठेवा, असे आवाहन नवनाथ वाघमारे यांनी केले.
मुख्यमंत्र्यांनी सर्वांना समान न्याय देण्याची शपथ घेतली आहे, पण अशा परिस्थितीत ते सुद्धा बोलत नाहीत. त्यांना जर झुंडशाहीचीच भाषा कळत असेल तर आम्ही सुद्धा संघर्ष यात्रा काड असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला.
मराठवाड्यातील वेगवेगळे आमदार मनोज जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देत असल्याच्या मुद्यावर हाके यांनी खळबळजनक आरोप केला, जरांगे यांच्या आंदोलनासाठी एकएक आमदार दहा दहा लाखांचे पॅकेज देत असून ओबीसींच्या प्रश्नावर मात्र हे लोक बोलत नसल्याचे सांगितले. आम्ही या सर्व प्रकाराविरोधात बोलतोय तर जीभ हासडण्याची भाषा, काळे फासणाऱ्याला बक्षीस देण्याची भाषा केली जात आहे.