बीड

Beed News | रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा लातूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू

त्याच्या या अचानक आणि अपघाती जाण्याने साळेगाव व परिसर हळहळत आहे

पुढारी वृत्तसेवा

गौतम बचुटे :

केज : शेतात मशागतीचे काम करत असताना ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून गंभीर जखमी झालेल्या ३२ वर्षीय तरुणाचे लातूर येथे उपचारादरम्यान दुर्दैवी निधन झाले. मंगेश बाबुराव टोपे असे या मृत तरुणाचे नाव असून, तो केज तालुक्यातील साळेगाव येथील रहिवासी होता. तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याची प्राणज्योत मालवली.

मिळालेल्या माहितीनुसार, २ जून रोजी मंगेश टोपे हा आपल्या शेतात खरीप हंगामापूर्वीची मशागत करत होता. यादरम्यान ट्रॅक्टरवर चढत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो थेट चालू रोटाव्हेटरमध्ये अडकला. या भीषण अपघातात त्याच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती, तसेच पाय फ्रॅक्चर होऊन कानालाही मोठी इजा झाली होती.

अपघात झाल्यानंतर मंगेशला तातडीने केज येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे गेल्या दहा दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, गुरुवारी (११ जून) मध्यरात्री १:३० वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.

मंगेश अत्यंत गरीब कुटुंबातील असून तो मनमिळावू स्वभावाचा होता. त्याच्या या अचानक आणि अपघाती जाण्याने साळेगाव व परिसर हळहळत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, चार आणि दीड वर्ष वयाच्या दोन निष्पाप मुली, तसेच वृद्ध आई-वडील असा मोठा परिवार आहे. घराचा कमावता आधार गेल्याने टोपे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज, शुक्रवार दिनांक १२ जून रोजी केज-कळंब रोडवरील त्यांच्या मूळ शेतात मंगेश यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT