Ghagar Morcha : पाण्यासाठी चोरंब्यात निघाला 'घागर मोर्चा' ! file photo
बीड

Ghagar Morcha : पाण्यासाठी चोरंब्यात निघाला 'घागर मोर्चा' !

झोपडपट्टी भागातील नागरिकांची ५ वर्षांपासून भटकंती; तत्काळ पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Beed News: 'Water Pot Protest' (Ghagar Morcha) held in Choramba over water scarcity!

धारूर, पुढारी वृत्तसेवा : धारूर तालुक्यातील चोरंबा येथील झोपडपट्टी भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत आहे. वारंवार निवेदने देऊनही पाणीपुरवठ्याचे कायमस्वरूपी नियोजन करण्यात न आल्याने संतप्त झालेल्या महिला व ग्रामस्थांनी शनिवारी (ता. १९) ग्रामपंचायत कार्यालयावर महिला व मुलांसह थेट 'घागर मोर्चा' काढला. तत्काळ पिण्याच्या पाण्याचे नियोजन करून नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी उग्र मागणी यावेळी करण्यात आली.

चोरंबा येथील झोपडपट्टी भागात सुमारे ४०० ते ५०० नागरिक वास्तव्यास आहेत. या भागातील नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे शरद रिड्डे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. पाणी मिळवण्यासाठी महिला व लहान मुलांना तब्बल ५ ते ६ किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागत असून, पाण्यासाठी रोज मोठी कसरत करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या गंभीर प्रश्नाबाबत ग्रामस्थांनी यापूर्वी अनेक वेळा ग्रामपंचायत चोरंबा तसेच पंचायत समिती धारूर येथे निवेदने दिली होती. या निवेदनाची दखल घेत धारूरच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित ग्रामपंचायतीला पत्र देऊन झोपडपट्टी भागात तात्काळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले होते.

मात्र, या पत्रव्यवहारानंतरही प्रशासनाकडून कोणतीही प्रत्यक्ष हालचाल झाली नाही, ज्यामुळे नागरिकांमधील असंतोष वाढला आहे. सध्या संपूर्ण बीड जिल्ह्यात दुष्काळाचे सावट असून पावसामुळे पाणीटंचाईची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. हिवाळ्यातच जर ५-६ किलोमीटर भटकंती करावी लागत असेल, तर ऐन उन्हाळ्यात किती हाल होतील, असा चिंताजनक प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पाण्याची व्यवस्था न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशारा

"पाणी ही प्रत्येक नागरिकाची मूलभूत गरज आहे. गेल्या ५ वर्षांपासून लोक पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. शनिवारी महिला व मुलांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. तत्काळ पाईपलाईन जोडून पाणीपुरवठ्याचे नियोजन केले नाही आणि नागरिकांची भटकंती थांबवली नाही, तर येत्या काळात यापेक्षा तीव्र धरणे आंदोलन छेडले जाईल असे सामाजिक कार्यकर्ते शरद रिड्डे व गंगाराम मुळे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT