Crop Loan : पीक कर्ज हवे, तर जमीन इतरांच्या नावावर करा file photo
बीड

Crop Loan : पीक कर्ज हवे, तर जमीन इतरांच्या नावावर करा

दुष्काळी भागातील वृद्ध शेतकऱ्यांना बँकेचा अजब सल्ला

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Transfer land to others' names if you want a crop loan

विनोद ढोबळे

आष्टी : दुष्काळाच्या संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी पीक कर्ज मिळविण्यासाठी आपल्या जमिनी इतरांच्या नावावर करण्याचा अजब सल्ला बँकेकडून दिला जात असल्याची तक्रार समोर आली आहे. विशेषतः वय जास्त असलेल्या वृद्ध शेतकऱ्यांना या प्रकारामुळे मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून, बँकेच्या या भूमिकेबद्दल शेतकरी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

यापूर्वी पीक कर्ज घेतलेल्या काही शेतकऱ्यांचे कर्जमाफीमध्ये कर्ज माफ झाले. त्यानंतर पात्र शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने पीक कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, काही वृद्ध शेतकऱ्यांचे वय अधिक असल्याचे कारण पुढे करून त्यांना नव्याने पीक कर्ज देण्यास बँकेकडून अडचणी निर्माण केल्या जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावर उपाय म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी कुटुंबातील किंवा इतर व्यक्तींच्या नावावर करून घ्याव्यात आणि त्यानंतर नव्या नावाने पीक कर्जासाठी अर्ज करावा, असा सल्ला बँकेकडून दिल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. जमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित बाबींमध्ये बदल करण्याचा हा सल्ला शेतकऱ्यांसाठी मोठी आर्थिक व कायदेशीर अडचण निर्माण करणारा ठरू शकतो.

राज्यातील अनेक तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली - असून, सरकारने राज्यातील २६५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत - शेतकऱ्यांना सुलभपणे पीक कर्ज उपलब्ध करून देण्याची गरज असताना कर्जासाठीच शेतकऱ्यांना जमिनीच्या मालकीत बदल करण्याचा सल्ला देणे योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

वृद्ध शेतकऱ्यांचा सवाल

वर्षानुवर्षे शेती करून उदरनिर्वाह करणाऱ्या वृद्ध शेतकऱ्यांना केवळ वयाच्या कारणामुळे कर्ज मिळण्यात अडथळे येत असतील, तर त्यासाठी शासन व बँकांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. "आमच्या नावावर जमीन असूनही आम्हाला पीक कर्ज मिळत नसेल, तर शेती कशी करायची?" असा प्रश्न वृद्ध। शेतकरी उपस्थित करत आहेत.

दरम्यान, राष्ट्रीयीकृत बँका गरजू आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्ज देताना कठोर निकष लावतात, मात्र मोठ्या कर्जदारांना कर्ज देताना वेगळी भूमिका घेतात, अशी भावना ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमध्ये असल्याचे दिसून येत आहे. या आरोपांची वस्तुनिष्ठ चौकशी करून पात्र शेतकऱ्यांना विनाअडथळा पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे. बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्यांच्या तक्रारींची चौकशी करावी आणि वयोवृद्ध शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

कर्ज वितरणसाठी वयोमर्यादा

निश्चित केलेली असल्याने जास्त वयाच्या व्यक्तींना कर्ज वितरित करण्यास अडचणी येत आहेत याविषयी वरिष्ठांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू असे भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी झाडे यांनी सांगितले. तर बीड जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेतून पीक कर्ज वितरणास कसलीही वयोमर्यादाची अट नव्हती. परंतु सद्यस्थितीला कर्ज वितरण बंद आहे अशी माहिती जिल्हा बँकेचे शाखाधिकारी शरद आजबे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT