Beed News : Sri Sant Tukobarai Pavandham lit up with the light of 21 thousand lights
केज, पुढारी वृत्तसेवा : श्री संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथे 21 हजार दिव्यांचा भव्य दीपोत्सव अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण पावनधाम परिसर उजळून निघाला होता. या नेत्रदीपक दीपोत्सवाचा अनुभव घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविकांनी उपस्थिती लावली. भक्ती, श्रद्धा, सामाजिक एकात्मता आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम या सोहळ्यात अनुभवायला मिळाला.
संस्थानचे संस्थापक अध्यक्ष गुरुवर्य महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी श्री संत तुकोबारायांचे स्मरण करून परिसरातील दुष्काळाचे निराकरण व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा तसेच सर्वसामान्य जनतेला सुख-समृद्धी लाभावी, यासाठी प्रार्थना केली.
या कार्यक्रमास अंबासाखरचे चेअरमन रमेशराव आडसकर, अंबाजोगाई नगरीचे नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा, अंबासाखरचे माजी व्हाईस चेअरमन अशोकराव काकडे, अविनाश मोरे, वसंतराव मोरे, राहुल सोनवणे, डॉ. अशोक थोरात, अरुण काळे, माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर उबाळे, पंडितआप्पा सावंत, उद्धवबापू आपेगावकर, उत्तमराव पारेकर, उद्योजक नामदेव गोरे, गणेश महाराज भगत आणि उद्योजक प्रशांत निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
दीपोत्सवाच्या निमित्ताने परिसरातील माता-भगिनींनी अत्यंत सुबक, आकर्षक आणि कलात्मक रांगोळ्या साकारल्या होत्या. या रांगोळ्यांनी दीपोत्सवाच्या सौंदर्यात विशेष भर घातली. रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना अशोकराव काकडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यामध्ये आदर्श विद्यालय, बनसारोळा येथील मुलींच्या समूहाने प्रथम क्रमांक पटकावला.
काळे यांनी द्वितीय, तर सायली अनिल गलांडे, चिंचोलीमाळी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. बालासाहेब कदम यांच्या वतीने आलेल्या भाविकांना फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि वारकरी संप्रदायातील सेवाभावाचे दर्शन घडले. या भव्य सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी हनुमंत महाराज शिरसाट, अशोक महाराज वाघ, अमोल महाराज जाधव यांच्यासह पंचक्रोशीतील नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले.