बीड

Shravan masarambh 2026 : रुद्राभिषेकाने वैद्यनाथनगरीत श्रावणपर्वाला सुरुवात

Parali Vaijnath Temple: प्रभू वैद्यनाथाची वेदोक्त मंत्रोच्चारात पहाटे झाली षोडशोपचार पूज

पुढारी वृत्तसेवा

परळी वैजनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या प्रभू वैद्यनाथाच्या नगरीत पवित्र श्रावण मासाचा प्रारंभ आज गुरुवारी (दि.१३) भक्तिमय वातावरणात झाला. श्रावणाच्या प्रारंभानिमित्त पहाटेच्या सुमारास वैद्यनाथ देवस्थान समितीचे सचिव राजेश देशमुख यांच्या हस्ते प्रभू वैद्यनाथाचा पारंपरिक पद्धतीने श्रावण आरंभ रुद्राभिषेक करण्यात आला.

ब्रह्मवृंदांच्या वेदोक्त मंत्रोच्चारात श्रावण आरंभाच्या निमित्ताने प्रभू वैद्यनाथाला षोडशोपचारे पूजा अर्पण करण्यात आली. पंचामृत स्नानानंतर विधियुक्त रुद्राभिषेक करण्यात आला. वेदोक्त मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींच्या वातावरणात पूजा झाल्यानंतर महाआरती करण्यात आली. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले.

पवित्र श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू झाली. पहाटेच्या पूजाविधीनंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भक्तिभावाने ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. श्रावण महिन्यात भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने पुढील महिनाभर परळी वैजनाथ येथे देशाच्या विविध भागांतून मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. श्रावणातील सोमवारी भगवान शिवाच्या दर्शनाला विशेष महत्त्व असल्याने या दिवशी वैद्यनाथ मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होत असते.

श्रावण महिन्यात विविध धार्मिक विधी, अभिषेक आणि दर्शनासाठी परळी वैजनाथ येथे भाविकांची मोठी उपस्थिती राहणार आहे.आज पहाटे पारंपरिक पद्धतीने झालेल्या श्रावण आरंभ रुद्राभिषेकाने वैद्यनाथनगरीतील श्रावण पर्वाला सुरुवात झाली. मंदिरातील मंत्रोच्चार, घंटानाद आणि ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT