

Heart Attack in Sanctum Sanctorum
परळी वैजनाथ : बारा ज्योतिर्लिंगांपैकी पंचम ज्योतिर्लिंग असलेल्या परळीच्या प्रभु वैजनाथ मंदिरात आज श्रावण महिन्यातील पहिला श्रावण सोमवार असल्याने प्रचंड गर्दी झालेली आहे. दिवसभर मंदिर व परिसर हजारो भाविकांनी गजबजून गेलेला आहे. श्रावण महिन्याच्या निमित्ताने मंदिर प्रशासनाने मंदिर परिसरात सर्व मार्ग बंदिस्त केलेले आहेत.
दर्शन रागांचे बॅरिकेटिंग, त्याला लोखंडी जाळ्या लावण्यात आलेल्या आहेत. या दर्शन रांगेत प्रवेश घेतला की, या रांगांतून बाहेर पडण्यासाठीची कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे प्रचंड गर्दीत असा काही गंभीर प्रकार घडल्यास भाविकांना त्यातून बाहेर काढणे जिकरीचे बनलेले आहे.
यातच आता संध्याकाळच्या सुमारास वैद्यनाथ मंदिरात गाभार्यात सेवा देत असलेला पुजारी अचानक गाभार्यातच जागेवर कोसळला. काही वेळ काय घडले? हे कळलेच नाही. मात्र काही भाविकांच्या ही बाब लक्षात आली.
तातडीने एका युवकाने जाळीवरुन उडी घेऊन आत जाऊन त्यास गाभार्याच्या बाहेर आणले. परळी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, या पुजाऱ्याला जागेवरच हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. विवेक शंकर पुजारी वय 28 वर्षे असे या पुजाऱ्याचे नाव आहे. परळी येथील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.