कड्याच्या बंधाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष! pudhari photo
बीड

Beed News : कड्याच्या बंधाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष!

तीन महिन्यांपासून रस्ता बंद; शेतकरी-नागरिक त्रस्त, प्रशासन सुस्त

पुढारी वृत्तसेवा

कडा : आष्टी तालुक्यातील कडा येथील कोल्हापूरी बंधाऱ्याची दुरवस्था दिवसेंदिवस भीषण होत चालली असून, प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ग्रामस्थांचे हाल अत्यंत वाढले आहेत. दिनांक 15 सप्टेंबरच्या महापुरात बंधाऱ्याचे मोठे नुकसान झाले; दरवाज्यांतून प्रचंड गळती, संरचनेला तडे आणि रस्त्याचे पूर्ण नुकसान झाले आहे. परंतु घटनेला तीन महिने उलटूनही संबंधित विभागाने एकदाही शास्त्रोक्त पाहणी न करता केवळ ‌‘जुजबी डागडुजी‌’ करून हा ज्वलंत प्रश्न थंडावण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांनी लेखी स्वरूपात तक्रारी केल्या, वारंवार विनवण्या केल्या; मात्र अधिकारयावर कुठलाही परिणाम झाला नाही.

बंधाऱ्यावरची मुख्य वाट ही कडा-सुंदरनगर परिसराला जोडणारी अत्यंत महत्त्वाचा असा रस्ता, हा मार्ग सतत तीन महिन्यांपासून बंद असल्याने शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मोठा वळसा घ्यावा लागत आहे. रोजची मेहनत, वेळ, खर्च सगळे दुप्पट झाले आहे.तीन महिने झाले, एकही जबाबदार अधिकारी पाहणीसुद्धा करायला आला नाही, असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला.दरवाजे खराब अवस्थेत असल्याने बंधाऱ्यातील पाणी साठतच नाही.

सततची गळती सुरू असून बंधाऱ्याचा मूळ उद्देश-पाणीसाठा व शेतीसाठी उपलब्धता धोक्यात आली आहे. त्यामुळे पुढील हंगामात पाण्याअभावी मोठे संकट निर्माण होऊ शकते, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.ग्रामस्थांच्या जीविताशी आणि शेतीच्या भविष्याशी खेळ करणे हा अत्यंत गंभीर विषय असून, अधिकाऱ्यांचे मौन आणि दुर्लक्ष संतापजनक असल्याचे नागरिक म्हणत आहेत.

सततच्या दुर्लक्षामुळे प्रश्न सुटण्या पेक्षा अधिक गंभीर बनत आहे. आता तरी विभाग जागे होऊन ठोस निर्णय घेणार का? असा सवाल सर्वत्र केला जात आहे.कोल्हापूरी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करून रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे, गळती थांबवणे आणि भविष्यातील पाणीसंचय सुरक्षित करणे-हे सर्व उपाय ताबडतोब करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. जलसंधारण अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची बाजू समजू शकली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT