Beed News : हास्तूर तलाव कोरडाठाक; पिण्याच्या पाण्याची चिंता file photo
बीड

Beed News : हास्तूर तलाव कोरडाठाक; पिण्याच्या पाण्याची चिंता

पाण्याची पातळी खालावल्याने हातपंप व बोअरवेल बंद

पुढारी वृत्तसेवा

Beed News : Hastur lake dry; Drinking water concerns

आष्टी, पुढारी वृत्तसेवा परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने आष्टी गावालगत असलेला हास्तूर पाझर तलाव पूर्णपणे कोरडाठाक पडला आहे. तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने परिसरातील भूजलपातळी झपाट्याने खालावली असून गावातील अनेक सरकारी हातपंप तसेच घरगुती बोअरवेलच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. काही हातपंप बंद पडल्याने नागरिकांना आतापासूनच पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगामी काही महिन्यांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता असून आष्टीकरांसमोर तीव्र पाणीटंचाईचे मोठे संकट उभे राहण्याची चिन्हे आहेत.

आष्टी गावापासून हाकेच्या अंतरावर असलेला हास्तूर तलाव सुमारे ४०० एकर क्षेत्रात पसरलेला असून हा पाझर तलाव परिसरातील भूजलपातळी टिकवून ठेवण्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. या तलावात पाणीसाठा उपलब्ध असताना त्याचा झिरपणारा पाण्याचा प्रवाह आष्टी गावातील अनेक भागांतील विहिरी, हातपंप व बोअरवेलसाठी उपयुक्त ठरतो. त्यामुळे मागील काही वर्षांत पाण्याची टंचाई तुलनेने कमी जाणवत होती.

मात्र, यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल्याने हास्तूर तलावात अपेक्षित पाणीसाठा निर्माण झाला नाही. परिणामी तलाव कोरडे पडले असून त्याचा थेट परिणाम भूजलपातळीवर झाला आहे. गावातील काही हातपंपांना पाणी येणे बंद झाले आहे, तर अनेक बोअरवेलची पाणीपातळीही मोठ्या प्रमाणात खालावली आहे.

नळपाणीपुरवठ्याचा प्रश्न अद्याप कायम आष्टी गावातील नळाद्वारे होणारा पाणीपुरवठ्याचाही प्रश्न अनेक वर्षांपासून कायम आहे. पूर्वी शिष्टी येथील पाझर तलावातून आष्टीला पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, सुमारे सात आठ वर्षांपूर्वी शेगाव-पंढरपूर महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर रस्त्याच्या कामामुळे भूमिगत पाइपलाइनचे मोठे नुकसान झाले.

ही पाइपलाइन निकामी झाल्याने त्यानंतरचा नळपाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. नळाद्वारे नियमित पाणीपुरवठा नसल्याने गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर हातपंप व बोअरवेलवर अवलंबून आहेत. मात्र, आता हास्तूर तलावही कोरडा पडल्याने भूजलसाठ्यावर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. आगामी काळात मोठा ताण निर्माण होण्याची शक्यता आहे.

पाणीप्रश्नावर तातडीच्या उपाययोजनांची मागणी

गावातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वी ग्रामपंचायतीने तसेच संबंधित प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. बंद पडलेले हातपंप दुरुस्त करणे, उपलब्ध पाणीस्रोतांचे सर्वेक्षण करणे, पर्यायी पाण्याची व्यवस्था करणे तसेच बंद असलेला हातपंप, नळाद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.

उपाययोजना करा

पावसाअभावी हास्तूर तलाव कोरडा पडल्याने आष्टीच्या पाणीप्रश्नाचे गांभीर्य पुन्हा एकदा समोर आले आहे. आगामी काळात पाणीटंचाई तीव्र होण्यापूर्वी प्रशासनाने ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात.

अन्यथा नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येऊ शकते, ग्रामपंचायतने लक्ष देऊन शिष्टी इथून पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT