Beed News : खवा, पनीरमध्ये घातक सॅफोलाइटची भेसळ file photo
बीड

Beed News : खवा, पनीरमध्ये घातक सॅफोलाइटची भेसळ

शिरूर तालुक्यातील प्रकार; अस्वच्छ वातावरणात उत्पादन, ३५ हजारांचा माल नष्ट; व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

Beed News: Harmful saffolite adulteration in khawa, paneer

बीड, पुढारी वृत्तसेवा शिरूर कासार तालुक्यातील दहीवंडी येथे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाड टाकून अस्वच्छ वातावरणात तयार करण्यात येणाऱ्या संशयित भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला. गंभीर बाब म्हणजे या ठिकाणी खवा, पनीर हे चमकदार दिसण्यासाठी घातक अशा सॅफोलाईटची भेसळ केली जात होती. या ठिकाणी सुमारे 35 हजार 536 रुपयांचा मिल्क केक, बर्फी व अन्य अन्नपदार्थ घटनास्थळीच नष्ट करण्यात आले असून, संबंधित व्यावसायिकाविरुद्ध अन्न सुरक्षा कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार 1 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासन, बीड आणि शिरूर कासार पोलिसांच्या संयुक्त पथकाने मे. जय श्री कृष्णा केक अँड बर्फी, दहीवंडी येथे गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकला. तपासणीदरम्यान संबंधित आस्थापनात अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे नियम धाब्यावर बसवून अत्यंत अस्वच्छ व अनारोग्यकारक वातावरणात बर्फी व मिल्क केकचे उत्पादन सुरू असल्याचे निदर्शनास आले.

उत्पादनासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल तसेच तयार अन्नपदार्थाचे नमुने विलेषणासाठी जप्त करण्यात आले. यामध्ये मिल्क केक (व्हाईट), ब्राऊन बर्फी, खोवा, रवा, रिफाइंड पामोलीन तेल, मोतीचूर दाणा तसेच 'सॅफोलाइट' हा संशयित भेसळकारी पदार्थ यांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.

मतपासणीत जप्त करण्यात आलेला 35 हजार 536 रुपयांचा मिठाई व कच्च्या मालाचा साठा कमी दर्जाचा, असुरक्षित व भेसळयुक्त असल्याच्या संशयावरून तसेच अस्वच्छ व अयोग्य साठवणुकीमुळे नाशवंत असल्याने घटनास्थळीच खोल खड्यात टाकून नष्ट करण्यात आला.

याशिवाय संबंधित आस्थापनातील त्रुटी दूर होईपर्यंत व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. तपासणीदरम्यान 'सॅफोलाइट' हा भेसळकारी पदार्थ आढळून आल्याने अन्न सुरक्षा अधिकारी अभय गाढे यांनी कार्तिक सवाईसिंग राजपुरोहित (वय 22, रा. दहीवंडी, ता. शिरूर कासार) याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा, 2006 चे कलम 57 तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम 274 व 275 अंतर्गत शिरूर कासार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

ही कारवाई सहआयुक्त (अन्न) एस. आर.करकाळे, सहायक आयुक्त (अन्न) नि. सु. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सि. सु. खंदारे, अ. दि. नरवाडे तसेच शिरूर कासार पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुलकर्णी आणि सहायक पोलिस निरीक्षक राजेश गडवे यांच्या पथकाने संयुक्तरीत्या केली.

काय आहे सॅफोलाईट?

सॅफोलाइट ज्याला रासायनिक भाषेत सोडियम फॉर्मल्डिहाइड सल्फॉक्सीलेट किंवा रॉन्गालाइट असे म्हणतात, हे प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी असलेले एक शक्तिशाली रासायनिक द्रव्य आहे. सॅफोलाइटचा मुख्य वापर टेक्सटाईल आणि कापड उद्योगः कपड्यांना रंग देण्यासाठी, छपाई करण्यासाठी आणि कापडावरील अतिरिक्त रंग काढण्यासाठी याचा प्रामुख्याने वापर केला जातो. फार्मास्युटिकल उद्योगः औषध निर्माण क्षेत्रातही विशिष्ट प्रक्रियांसाठी याचा उपयोग केला जातो. आरोग्यावरील दुष्परिणाम आणि भेसळ : सॅफोलाइट हा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आणि विषारी पदार्थ आहे. दुग्धजन्य पदार्थ जसे की खवा, पनीर आणि यामध्ये पांढरा, ताजे आणि चमकदार दिसण्यासाठी सॅफोलाइटची बेकायदेशीर भेसळ केली जाते. या भेसळीमुळे पोटदुखी, अपचन, डायरिया आणि अॅसिडिटी यांसारख्या तत्काळ समस्या उद्भवू शकतात दीर्घकाळ अशा केमिकलयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास अंतर्गत अवयवांचे नुकसान होऊन कर्करोग होण्याचाही मोठा धोका असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT