Agricultural Homeopathy | अ‍ॅग्रो होमिओपॅथीचा नवा प्रवाह

Agricultural Homeopathy
Agricultural Homeopathy | अ‍ॅग्रो होमिओपॅथीचा नवा प्रवाहPudhari File Photo
Published on
Updated on

नवनाथ वारे, कृषी अभ्यासक

वाढता उत्पादन खर्च, रासायनिक खतांवरील वाढते अवलंबित्व, मातीची खालावलेली सुपीकता आणि पर्यावरणीय र्‍हास या सार्‍या समस्यांनी शेतकर्‍यांची कोंडी झाली आहे. अशा परिस्थितीत जर कमी खर्चात, पर्यावरणस्नेही आणि दीर्घकालीन परिणाम देणारा पर्याय उपलब्ध झाला, तर तो शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरू शकतो. याद़ृष्टीने होमिओपॅथीचा कृषी क्षेत्रातील वापर म्हणजेच ‘कृषी होमिओपॅथी’ हा पर्याय पुढे आला आहे. याबाबत पुदुचेरीत केलेला प्रयोग सध्या चर्चेत आहे.

गोड बारीक गोळ्या आणि मुळासकट आजाराचे उच्चाटन करण्यासाठी प्रभावी मानली जाणारी होमिओपॅथी उपचाराची पद्धत आता शेतीतही अमलात आणली जात आहे. कृषी क्षेत्रात त्याचा यशस्वीपणे वापर केला, तर अनेक समस्यांवर तोडगा काढणे शक्य राहू शकते, असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. ही पद्धत नजीकच्या काळात रासायनिक कीटकनाशके आणि खतांना पर्याय देणारी ठरू शकते. या माध्यमातून पिकांच्या उत्पादनात वाढ, किडीचा प्रादुर्भाव रोखणेआणि कृषी क्षेत्राचा सर्वंकष विकास करण्यासाठी उपयुक्त माध्यम ठरू शकते.

भारतात याद़ृष्टीने अनेक संशोधने केली जात असून प्रयोगही केले जात आहेत. जाणकारांच्या मते, या पद्धतीत रोपट्यांना अंतर्गत रूपातून मजबूत करण्यावर भर दिला जातो, जेणेकरून नैसर्गिकरूपाने रोगराईचा मुकाबला करणे शक्य होते. कृषी होमिओपॅथीमुळे मातीत मिसळल्या जाणार्‍या रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान टाळले जाते. मातीतील अवशेषांचा समूळ नायनाट होतो आणि शेवटी मातीची सुपिकता वाढण्यास मदत होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महागड्या आणि पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत कमी असणारा खर्च. यामुळे कृषी क्षेत्रात होमिओपॅथीचा वापर हा नक्कीच क्रांतिकारी पाऊल ठरू शकतो. अ‍ॅग्री होमिओपॅथी रोपट्यांना सक्षम करण्याबरोबरच अंतर्गत प्रक्रियादेखील मजबूत करते. रोपट्यांची सर्वंकष वाढ होऊन ती नैसर्गिक रूपानेदेखील आपोआप किडीचा सामना करण्यास सक्षम बनतात. या सुविधेमुळे महागड्या आणि गरजेच्या वेळी उपलब्ध न होणार्‍या रासायनिक खतांचा वापर करण्याची गरज भासत नाही.

एखाद्या आजाराला मुळासकट काढण्याचे काम होमिओपॅथी उपचार पद्धतीत आहे. तीच मात्रा इथेही लागू केली जाईल. हाच सिद्धांत माती आणि रोपट्यांना लागू होतो. होमिओपॅथी ही अनुवांशिक हालचाली आणि चयापचय म्हणजेच ‘मेटाबालिज्म’च्या बदलातील प्रक्रियेला प्रोत्साहित करून पिकांची प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते.

कृषी क्षेत्रात होमिओपॅथी औषधांचा वापर अनेक दशकांपासून होत आहे आणि तो यशस्वीही ठरला आहे; मात्र त्याचा वापर मर्यादित आहे; पण आता यासंदर्भात जगभरात संशोधन वाढले असून लोकांना त्याविषयी जिज्ञासा वाढली आहे. परिणामी, सर्व पातळ्यांवर त्याची चर्चा होताना दिसत आहे. एखादा रुग्ण होमिओपॅथी डॉक्टरकडे जातो तेव्हा त्याच्यावर परिणामकारक उपचार केले जातात आणि त्या आजाराचे समूळ उच्चाटन करण्याचा प्रयत्न होतो. हाच मार्ग कृषी क्षेत्रानेदेखील स्वीकारला आहे. यानुसार जागतिक पातळीवर होमिओपॅथीचे नवे रूप म्हणून ‘अ‍ॅग्रो होमिओपॅथी’कडे पाहता येईल आणि भविष्यात शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी एक सक्षम पर्याय म्हणून समोर येऊ शकेल. पाण्याच्या थेंबात सामावलेले होमिओपॅथी औषध हे शेती व शेतकर्‍यांसाठी आरोग्यदायी आणि उपयुक्त ठरू शकते. खर्चाचा विचार केला, तर महागडे खत आणि रासायनिक पदार्थांच्या तुलनेत ही पद्धत अधिक स्वस्त राहिल. कमी खर्चाचे होमिओपॅथी औषध हे भविष्यात पानाफुलांवर अवलंबून असणार्‍या जीवजंतुनादेखील उपकारक ठरेल. रासायनिक पदार्थांमुळे त्यांचा जीव गुदमरत असताना होमिओपॅथी औषध त्यांना जीवदान देण्याचे काम करेल.

भारतात होमिओपॅथी औषधांच्या अनेक ठिकाणी चाचण्या झाल्या. होमिओपॅथी औषधे ही रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी सक्षम असल्याचे सर्वश्रूत आहे. कृषी होमिओपॅथी मातीचे आरोग्य अणि सुपिकता कायम ठेवत रोपट्यांची वाढ करेल आणि त्यामुळे लागवड क्षेत्रही वाढेल. सध्या कृषी होमिओपॅथीचा पुदुचेरीत केलेला प्रयोग चर्चेत आहे. या ठिकाणी संशोधकांनी शेतकर्‍यांसमवेत सेंद्रिय शेतीसह एक पाऊल पुढे टाकत होमिओपॅथी शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. होमिओपॅथी उपचारामुळे एकीकडे पाण्याचा वापर कमी झाला आणि दुसरीकडे प्रदूषणही कमी झाले. शिवाय भूजल पातळीही वाढली. यापूर्वी कृषी क्षेत्रात होमिओपॅथीचा वापर शक्य आहे का, यासाठी 2018 मध्ये प्रयोगास सुरुवात झाली होती. आता त्याला मिळालेले यश म्हणजे नाबार्डचे मिळालेले समर्थन. प्रयोगशाळेत होणारी चाचणी शेतीतही केली गेली. त्यांचे पहिले पीक भेंडी होते आणि त्याचे विक्रमी उत्पादन पाहावयास मिळाले. त्यानंतर धानाच्या पिकातही त्याचा प्रयोग यशस्वी झाला. पिकांच्या तिन्ही हंगामांत या प्रयोगाने मोलाची कामगिरी केली. होमिओपॅथी औषधांनी केवळ पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविली नाही, तर मातीची सुपिकता टिकवण्यासाठी आवश्यक असणार्‍या रासायनिक घटक पदार्थांवरचे अवलंबित्वही कमी केले.

कृषी होमिओपॅथीच्या मिश्रणाने झाडांना संजीवनी मिळत असताना मातीतील सूक्ष्म जीवांचेदेखील पोषण झाले. त्यामुळे जैवविविधता वाढली. शेतीत गांडूळ आणि मातीतील सूक्ष्म जीवांचे पुनरुज्जीवन झाले. त्यामुळे मातीची नैसर्गिक सुपिकता पुन्हा दिसू लागली. साहजिकच पर्यावरणपुरकतेच्या दिशेने हा प्रयोग मैलाचा दगड ठरला. तीन वर्षांपासून प्रयोगात सातत्य ठेवण्यात आले आणि त्यात होमिओपॅथीचा प्रभावी वापर केल्याने उत्पादनात स्थैर्य आणि आश्चर्यकारक वाढ दिसून आली. संशोधकांच्या मते, कृषी होमिओपॅथीचा खर्च खूपच कमी असतो. साधारणपणे एक शेतकरी रासायनिक खतांवर सरासरी वीस ते तीस हजार रुपये प्रतिहेक्टर खर्च करत असेल, तर होमिओपॅथीचा वापर हा केवळ सातशे रुपये प्रतिहेक्टर राहू शकतो. तसेच होमिओपॅथीच्या औषधांचे काही अंश हे शेकडो लिटर पाण्यात कळत-नकळतपणे मिसळण्यास रासायनिक घटकांचा प्रभाव कमी करतात. एकार्थाने शेतीत हानिकारक रासायनिक पदार्थांचा वापर कमी करणे, पिकांत पौष्टिकता वाढविणे आणि मातीची गुणवत्ता टिकून राहण्यास मदत मिळते. परिणामी, शेतकर्‍यांना शेतीमालाला चांगला भाव मिळू शकतो.

भारतात कृषी होमिओपॅथी पद्धत लोकप्रिय होत असून जवळपास प्रत्येक राज्यातील शेतकरी या पद्धतीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. भेंडी, मिरची आणि अन्य भाजीपाल्याव्यतिरिक्त बटाटे, गहू, मका, धान, तीळ, डाळी यातही होमिओपॅथीचा वापर महत्त्वाचा ठरत आहे. होमिओपॅथीच्या प्रभावामुळे पिकांवर पडणारी कीड आपोआप कमी होते. आगामी काळात त्याचा वापर वाढल्यास आणि त्याचे आणखी सकारात्मक परिणाम हाती पडल्यास कृषी होमिओपॅथीच्या आणखी काही पद्धती विकसित होतील.

महत्त्वाची बाब म्हणजे, कृषी होमिओपॅथी तत्काळ चमत्कार घडवण्याचे आश्वासन देत नाही. सुरुवातीच्या काळात संयम ठेवावा लागतो; मात्र दीर्घकालीन द़ृष्टिकोनातून पाहिले, तर ही पद्धत शेतीला शाश्वततेकडे नेणारी ठरू शकते. रसायनांच्या ओझ्याखाली दबलेल्या जमिनीला नवजीवन देण्याची क्षमता कृषी होमिओपॅथीत आहे. सातत्यपूर्ण संशोधन, शास्त्रीय मूल्यांकन आणि धोरणात्मक पाठबळ मिळाल्यास ही पद्धत केवळ पर्यायी शेती पद्धत न राहता भारतीय शेतीच्या पुनरुज्जीवनाचा एक महत्त्वाचा मार्ग ठरू शकते. भविष्यात माती आणि पाणी आपल्या मूळ स्वरूपात परत येऊन निसर्गाला नवी ऊर्जा देतील, अशी आशा या प्रयोगांतून निश्चितच निर्माण होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news