Beed News: A woman who stole jewelery was chased and caught by a bus conductor
कडा, पुढारी वृत्तसेवा : बसमधील गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेची दागिन्यांची पिशवी हिसकावून पळणाऱ्या महिलेचा महिला वाहक आलिशा बागवान यांनी पाठलाग करून तिला रंगेहात पकडले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध महिलेचे सुमारे एक तोळे सोन्याचे दागिने सुखरूप परत मिळाले.
शनिवारी सायंकाळी आष्टी आगाराची कडा-मिरजगाव बस मिरजगाव बसस्थानकावरून कड्याकडे रवाना होत असताना बसमध्ये मोठी गर्दी होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्या महिलेने बसमध्ये बसलेल्या एका वृद्ध महिलेच्या पिशवीवर डोळा ठेवला. योग्य संधी साधत तिने पिशवी हिसकावली आणि बसमधून उतरून पळ काढला.
पिशवी चोरीला गेल्याचे लक्षात येताच वृद्ध महिलेने आरडाओरड सुरू केली. हा प्रकार लक्षात येताच महिला वाहक आलिशा बागवान यांनी क्षणाचाही विलंब न करता चोरट्या महिलेचा पाठलाग केला. काही अंतरावर तिला पकडून तिच्याकडील पिशवी ताब्यात घेतली. पिशवीतील एक तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याची खात्री करून त्यांनी ते वृद्ध महिलेच्या स्वाधीन केले.
महिला वाहकाच्या या धाडसी आणि तत्पर कृतीचे बसमधील प्रवासी तसेच उपस्थित नागरिकांनी कौतुक केले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आणि वृद्ध महिलेचा ऐवज सुरक्षित परत मिळाला.
पोरी, तू साक्षात देवाच्या रूपात भेटलीस !
हरवलेले सोने परत मिळेल, अशी आशा जवळपास संपली असताना महिला वाहक आलिशा बागवान यांनी धाडस दाखवत चोरट्या महिलेला पकडले. सोन्याचे दागिने परत हातात पडताच भावूक झालेल्या वृद्ध महिलेच्या डोळ्यांत अश्रू तरळले. त्या भरल्या गळ्याने म्हणाल्या, पोरी, तू साक्षात देवाच्या रूपात भेटलीस. माझे आयुष्यभराचे जपलेले सोने तू मला परत मिळवून दिलेस. त्यांच्या या शब्दांनी घटनास्थळी उपस्थित अनेकांचे डोळे पाणावले.