Kej Taluka Fraud Case
केज : लग्नाच्या नावाखाली पैसे घेऊन फसवणूक केल्याची एक धक्कादायक घटना केज तालुक्यात उघडकीस आली आहे. अवघ्या दोन लाख रुपयांसाठी एका ३६ वर्षीय नवरदेवासोबत लग्न करून एका नववधूने तीन तासांतच पळ काढला. विशेष म्हणजे, पाठलाग करून नातेवाईकांनी तिला पकडल्यानंतर, तिनेच पोलिसांना फोन केला. चौकशीत हा बनावट लग्नाचा प्रकार समोर आला असून, नवरीसह बनावट लग्न लावून देणाऱ्या टोळीतील चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोदरी (ता. अंबाजोगाई) येथील नागेश देविदास जगताप (वय ३६) यांना प्रल्हाद गुळभिले या संभाजीनगर येथील एजंटने मुलगी दाखवली. लग्नासाठी १ लाख ९० हजार रुपये घेऊन ६ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजता दिपेवडगाव येथील हनुमान मंदिरात नागेश आणि प्रीती शिवाजी राऊत यांचे लग्न लावले.
लग्न झाल्यावर नववधू-वर कोदरी गावात नागेश यांच्या घरी आले. उंबऱ्यावरील माप ओलांडल्यानंतर अवघ्या तासभरातच नववधू प्रीती राऊत हिने 'टॉयलेट जाते' असे सांगून घरातून पळ काढला.
प्रीती पळून जात असल्याचे लक्षात येताच, नागेश आणि त्यांच्या नातेवाईकांनी तिचा पाठलाग सुरू केला. डिघोळअंबा पाटीजवळ नातेवाईकांनी तिला गाठले. 'का पळून जात आहेस?' असे विचारताच, प्रीती राऊत हिने तातडीने पोलिसांना फोन केला.
यानंतर, नागेश आणि प्रीती या सर्वांना युसुफवडगाव पोलीस ठाण्यात आणले गेले. पोलिसांनी प्रीतीची कसून चौकशी केली असता, तिने एजंट प्रल्हाद गुळभिले, तिची मावशी सविता (रा. पुणे), माया सतीश राऊत (रा. चाकण, पुणे) यांच्यासोबत संगनमत करून नागेश जगताप यांची १ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याची कबुली दिली.
नागेश जगताप यांच्या तक्रारीवरून युसुफवडगाव पोलीस ठाण्यात एजंट प्रल्हाद गुळभिले, नवरी प्रीती शिवाजी राऊत, सविता आणि माया सतीश राऊत या चौघांविरुद्ध फसवणूक आणि संगनमत केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिमराव मांजरे पुढील तपास करत आहेत.
नवरीला ३ दिवसांची पोलीस कोठडी: प्रीती राऊत हिला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता, तिला १० डिसेंबरपर्यंत ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
बनावट आधार कार्ड: लग्न करण्यापूर्वी या टोळीने प्रीती राऊत हिचे 'प्रीती नागेश जगताप' या नावाने बनावट आधार कार्ड तयार केले होते, अशी माहिती नागेश जगताप यांनी दिली आहे.
नवरदेवाची अपेक्षा: फसवणूक झालेले नागेश जगताप यांना किमान आपले दोन लाख रुपये तरी परत मिळावेत, अशी अपेक्षा आहे.
सकाळ: लग्नासाठी एजंटला पैसे पाठवले (यापूर्वीच १.९० लाख रुपये दिले होते).
दुपारी १२:३०: दिपेवडगाव येथे हनुमान मंदिरात लग्न पार पडले.
दुपारी ३:३०: नववधू-वर कोदरी (नवरदेवाच्या) घरी पोहोचले.
सायंकाळी ४:०० च्या सुमारास: नवरी 'टॉयलेटला जाते' या बहाण्याने घरातून पळून गेली.
सायंकाळ: नातेवाईकांनी पकडले आणि त्यानंतर सर्वजण युसुफवडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाले.