Arrested Pudhari
बीड

Beed Crime | मकोकातील आरोपीचा लॉकअपमध्ये जीवन संपविण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल

पुढारी वृत्तसेवा

Neknur Police Station MCOCA Accused

नेकनूर : आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आणि मकोकाअंतर्गत कारवाई झालेल्या आरोपीने पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये गळफास घेण्याचा प्रयत्न केला. शनिवारी (दि.१० ) पहाटे ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने आरोपीचे प्राण वाचले असून, त्याला उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बालाजी शिंदे (वय २२, रा. वाशी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध धाराशिव आणि बीड जिल्ह्यांत अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. आवादा कंपनीतील चोरीच्या प्रकरणात त्याला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याच्यावर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात आल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, बालाजी शिंदे हा नेकनूर पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये असताना शनिवारी पहाटे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास त्याने पांघरुणाच्या रगचा दोरा उसवून त्याच्या साहाय्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेनंतर बालाजी शिंदे याला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलीस कोठडीतील या घटनेची परिसरात चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT