गंभीर मारहाणीच्या घटना समोर आल्या असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  Pudhari
बीड

Beed Crime | नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी अमानुष मारहाण; तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप

कुऱ्हाड, अँगल, दांडके तसेच गमछामध्ये दगड बांधून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये दोघेजण गंभीर जखमी

पुढारी वृत्तसेवा

Neknur Police Station assault case

बीड : बीड तालुक्यातील नेकनूर पोलीस ठाणे हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गंभीर मारहाणीच्या घटना समोर आल्या असून त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. कुऱ्हाड, अँगल, दांडके तसेच गमछामध्ये दगड बांधून करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मात्र, व्हिडिओ समोर येऊनही पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

नेकनूर पोलीस ठाणे हद्दीतील लोणीघाट येथे भावा-भावामध्ये झालेल्या वादात अनिल श्रीरंग मिटकरी (वय ४०) यांना कुऱ्हाड, अँगल व दांड्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला असून त्यात हल्ल्याची गंभीरता स्पष्ट दिसून येते. जखमी मिटकरी यांच्यावर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज सकाळी जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकीत त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

दुसरी घटना वरडवाडी (ता. केज) येथे घडली. येथे दारू पाजण्यास नकार दिल्याच्या कारणावरून काही जणांनी रामराव बाबुराव दराडे यांना दगडांनी मारहाण केली. गमछामध्ये दगड बांधून त्यांच्या डोक्यावर, हातांवर आणि तोंडावर हल्ला केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या घटनेतही दराडे गंभीर जखमी झाले आहेत.

दोन्ही घटनांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊनही पोलिसांनी तातडीने कारवाई न केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. व्हिडिओ समोर आल्यानंतर संबंधितांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना पोलिसांनी अद्याप ठोस पावले उचलली नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT