Minor Girl Assault Beed
नेकनूर : नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत आजोबा- नातीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना उघडकीस आली. 60 वर्षीय आजोबांनी 15 वर्षाच्या नातीवर केलेल्या अत्याचाराच्या घटनेने खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नराधम 60 वर्षीय आजोबांवर आणि चुलत भावावर गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बीड तालुक्यातील एका गावात आजी- आजोबांच्या घरी राहणाऱ्या 15 वर्षाच्या मुलीच्या वाट्याला जे आलं ते ऐकून पायाखालची वाळू सरकेल. शाळेला सुट्या लागल्याने आई वडील बाहेर गावी कामाला गेले. आजी आणि इतर भावंडे शेतात शेळ्या चरण्यासाठी निघून गेल्यावर घरी एकटी असल्याचे पाहून आजोबांनी जेवण करताना नातीला बळजबरीने ओढून नेत तिच्यावर अत्याचार केला. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
दोन- चार दिवसांनी पोटात दुखू लागल्याने तिला हॉस्पिटलमध्ये नेत गोळ्या घ्यायल्या लावल्या. मात्र, औषधांनी फरक पडला नाही. शेवटी पुन्हा डॉक्टर कडे गेल्यावर महिला डॉक्टरांनी विश्वासात घेऊन पीडितेची विचारपूस केली. शेवटी पीडितेने आपबिती सांगितल्यावर डॉक्टरांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धक्कादायक म्हणजे पीडितेवर तिच्या चुलत भावानेही अत्याचार केल्याचे समोर आले आहे. इतकंच नव्हे तिचा चुलत भाऊ घरातील इतर लहान मुलींसोबत असं करत होता, असा फिर्यादीत उल्लेख आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी आजोबा आणि चुलतभावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.