डॉ. सारिका क्षीरसागर  
बीड

Beed Nagarparishad | सर्वसाधारण सभेतील ठराव रद्द करा

BJP leader demands cancellation of Beed municipal resolutions- भाजप गटनेत्या डॉ. सारिका क्षीरसागर यांची मागणी; खुर्शीद आलम यांचाही पाठिंबा

पुढारी वृत्तसेवा

बीड : बीड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत प्रचंड गोंधळ उडाला असताना आणि कोणतीही चर्चा अथवा मतदान न घेता घाईगडबडीत बेकायदेशीरपणे ठराव मंजूर केल्याचा प्रकार समोर आला आहे. याविरोधात भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने आक्रमक भूमिका घेत ही सर्वसाधारण सभा व त्यातील सर्व ठराव तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात भाजप गटनेत्या डॉ. सारिका योगेश क्षीरसागर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते खुर्शीद आलम यांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, मुख्याधिकारी विक्रम मांडुरके, नगराध्यक्षांना स्वतंत्र लेखी निवेदने दिली आहेत.

लोकनेते खा. गोपीनाथ मुंडे सभागृहात मंगळवारी आयोजित सर्वसाधारण सभेच्या कार्यपत्रिकेवर 18 विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. दरम्यान, सभेत नगरसेवक अमर नाईकवाडे यांनी भाजप गटनेत्यांविषयी अपशब्द उच्चारल्याने मोठा गदारोळ निर्माण झाला. सभाध्यक्षांनी गोंधळ थांबवण्यासाठी सभा तहकूब करणे आवश्यक असताना तसे न करता, सभागृहाचे लक्ष विचलित असताना उपाध्यक्ष विनोद मुळूक यांनी केवळ विषय वाचून दाखवत ठराव परस्पर संमत झाल्याचे घोषित केले, असा थेट आरोप डॉ. सारिकाताई क्षीरसागर यांनी निवेदनात केला आहे.

सभेमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा, सूचक-अनुमोदक नोंदणी अथवा मतदान झाले नसून ही कृती लोकशाही व कायदेशीर नियमांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी नमूद केले. एकीकडे बीड शहर पाणीटंचाई व मूलभूत नागरी समस्यांचा सामना करत असताना, सर्वसामान्यांना दिलासा देणारे निर्णय न घेता भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारे निर्णय रेटले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला. विशेषतः कार्यपत्रिकेवरील विषय क्र. 10 मधील 'सोलर हायमास्ट' कामातील अनियमितता पाहता त्याबाबतचा निर्णय तत्काळ रोखण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व घटनाक्रमावर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नेमकी काय भुमिका घेतली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

वैयक्तिक टीकाटिप्पणी

शहरातील मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करण्यात सत्ताधाऱ्यांना पूर्णपणे अपयश आले असून, स्वतःची निष्क्रियता आणि भ्रष्टाचाराकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे म्हणूनच महिला गटनेत्यावर सभागृहात जाणीवपूर्वक वैयक्तिक टीकाटिप्पणी करण्यात आली, असा घणाघाती आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. सभागृहाच्या शिस्तीचे आणि लोकप्रतिनिधी म्हणून महिलेच्या प्रतिष्ठेचे उघड उल्लंघन करून अपशब्द वापरणाऱ्या नगरसेवकावर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे लावून धरण्यात आली आहे

अन्यथा थेट न्यायालयात दाद मागणार; विरोधकांचा इशारा

बीड नगरपरिषदेत 3 नोव्हेंबर रोजी झालेली सर्वसाधारण सभा आणि त्यात मंजूर दाखवलेले सर्व ठराव तातडीने रद्द करावेत, अशी ठाम मागणी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या गटनेत्यांनी केली आहे. नवीन सभा होईपर्यंत या बेकायदेशीर ठरावांची अंमलबजावणी, निविदा प्रक्रिया, वर्क ऑर्डर आणि देयकांचे वितरण तत्काळ स्थगित ठेवावे; तसेच सभेच्या प्रोसिडिंगमध्ये हे ठराव संमत झाल्याची नोंद करू नये, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण सभेचे व्हिडिओ चित्रीकरण सुरक्षित जतन करून सदस्यांना रीतसर नोटीस देत चर्चेसह नव्याने सभा आयोजित करावी आणि सभागृहात गैरवर्तन, अपशब्द वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. प्रशासनाने यावर योग्य पावले न उचलल्यास विभागीय आयुक्त, नगरविकास विभाग आणि उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दोन्ही पक्षांच्या गटनेत्यांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT