बीड ः बीड शहरातील सुभाषरोडवर असलेल्या एका नामांकित मोबाईल शॉपीमध्ये चोरीची घटना दि.19 एप्रिल रोजी घडली होती. ही चोरी केल्यानंतर चोरट्याने या मोबाईल शॉपीमधील एक सुरू असलेला मोबाईल संभाजीनगरला जाणाऱ्या गाडीत टाकून पोलिसांना चकवा दिला होता, परंतु बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यालाच चमत्कार दाखवत ठाण्यातून अटक केली आहे. त्याच्यावर राज्यात व राज्याबाहेर पन्नासहून अधिक गुन्हे दाखल असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
रामनिवास मंजु गुप्ता (वय 37 रा.खडेगल्ली रामनगर चाळ क्र.7, कल्याण पुर्व जि.ठाणे ह.मु.सत्यभामा चाळ नं.1 दिवा पूर्व जिल्हा ठाणे) असे या चोरट्याचे नाव आहे. त्याने बीड शहरातील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्याने 30 लाखांचे मोबाईल लंपास केल्याची घटना अक्षय तृतीयेच्या दिवशी म्हणजेच 19 एप्रिल रोजी घडली होती.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे सदरील गुन्हा हा कल्याण येथील सराईत गुन्हेगार रामनिवास मंजु गुप्ता याने केल्याची माहिती प्राप्त झाली. त्यावरून पोलिस अधीक्षक नवनीत कांवत यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्याचे आदेशित केले. त्यानुसार पोउपनि सुशांत सुतळे, पो.ह.सोमनाथ गायकवाड, मारुती कांबळे, अर्जुन यादव, पोलिस अंमलदार मनोज परझणे, अशफाक सय्यद, पो.ह.अतुल हराळे यांनी ठाणे, मुंबई, गोवा व गुजरातमध्ये जाऊन आरोपीचा शोध घेतला.
अखेर दिवा पूर्व जिल्हा ठाणे येथे आरोपी असल्याची माहिती मिळताच विशेष पथकाने त्याठिकाणी जाऊन मोठ्या शिताफीने सापळा रचून रामनिवास गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली असून शॉपीमधून चोरून नेलेले मोबाईल त्याने त्रयस्थ इसमाकडे दिल्याचे सांगितले.
सदरील कामगिरी पोलिस अधीक्षक नवनीत कांवत, अप्पर अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पो.नि.शिवाजी बंटेवाड, पोउपनि सुशांत सुतळे, पो.ह.सोमनाथ गायकवाड, मारूती कांबळे, अर्जुन यादव, पोलिस अंमलदार मनोज परझणे, अशफाक सय्यद, विक्की सुरवसे, पो.ह. अतुल हराळे, सिध्देश्वर मांजरे यांनी केली.
राज्यात, राज्याबाहेरही केले गुन्हे!
रामनिवास गुप्ता हा सराईत चोरटा आहे. यापूर्वी त्याने जळगाव, अहिल्यानगर, पुणे या मोठ्या शहरासह गुजरातसह इतर राज्यात देखील अशा पद्धतीने चोऱ्या केल्या आहेत. विशेष म्हणजे रामनिवास गुप्ता हा एकटाच सगळे गुन्हे करतो. बीडमध्ये मोबाईल शॉपीमध्ये झालेल्या चोरीनंतर पोलिस त्याच्या मागावर होते. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.