प्राजक्ता धस  Pudhari
बीड

Prajakta Dhas | संशय निर्माण करणाऱ्या बातम्यांद्वारे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न : प्राजक्ता धस

दूध भेसळीविरोधात सर्वाधिक आवाज आमदार सुरेश धस यांनीच उठवला; पसरवलेल्या अफवा निराधार

पुढारी वृत्तसेवा

Milk Adulteration Issue

कडा : राज्यात सुरू असलेल्या दूध भेसळविरोधी कारवाईच्या पार्श्वभूमीवर काही समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांतून नाव न घेता आपली बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य दूध सहकारी महासंघ (महानंद)च्या संचालिका प्राजक्ता धस यांनी केला आहे. कोणतेही ठोस पुरावे नसताना सूचक पद्धतीने संशय निर्माण करणाऱ्या बातम्यांद्वारे आपली प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

प्राजक्ता धस यांनी सांगितले की, आमदार सुरेश धस यांनी गेल्या अनेक वर्षांपासून राज्यातील दूध भेसळीविरोधात सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. विधानसभेसह विविध बैठका आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे त्यांनी हा प्रश्न वारंवार उपस्थित केला. दूध भेसळ हा अजामीनपात्र गुन्हा घोषित करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी सातत्याने केली असून, ग्राहकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात कोणालाही पाठीशी घालण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यांच्या मते, आमदार सुरेश धस यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच राज्यातील दूध भेसळ प्रकरणांवरील कारवाईला गती मिळाली. मात्र, या कारवाईची धार कमी करण्यासाठी आणि जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यापासून विचलित करण्याच्या उद्देशाने काही राजकीय व्यक्तींकडून नियोजनबद्ध पद्धतीने अफवा पसरवल्या जात आहेत.

काही समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांमध्ये "बीडमधील आमदाराची पत्नी" किंवा "बड्या नेत्याची पत्नी" अशा उल्लेखांद्वारे प्रत्यक्ष नाव न घेता संशय आपल्यावर वळविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधितांकडे विचारणा केली असता, "बातमीत तुमचे नाव नाही," असे उत्तर देण्यात आले. मात्र, नाव न घेता एखाद्याची प्रतिमा मलिन करणे हे पत्रकारितेच्या नैतिकतेला धरून नसल्याचे त्यांनी नमूद केले.

पुणे जिल्ह्यातील मंचर परिसरातील एका दूध डेअरीबाबत संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर आपण स्वतः अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना संदेश पाठवून चौकशीची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भेसळ करणाऱ्यांचे समर्थन करण्याचा प्रश्नच येत नसून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या १५ वर्षांपासून मंचर येथील एका दूध संघ व दूध पावडर प्रकल्पाशी आपला कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, यापूर्वी आष्टी तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाचे धागेदोरे मंचर-आंबेगाव परिसरातील काही दूध संघांपर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे त्या परिसरातील दूध व्यवहारांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच गुणवत्तेच्या कारणास्तव नाकारलेले दूध काही अन्य डेअऱ्यांकडून स्वीकारले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वीही समोर आल्या असून, संबंधित डेअरीकडून बीएमसी चालक आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना तीन-तीन महिने देयके न मिळाल्याच्या तक्रारीही असल्याचे त्यांनी सांगितले. या व्यवहारांची निष्पक्ष चौकशी झाल्यास अनेक बाबी समोर येऊ शकतात, असा दावाही त्यांनी केला.

ज्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे असतील त्यांनी ते समाजमाध्यमांवर अपप्रचार करण्याऐवजी संबंधित तपास यंत्रणांकडे सादर करावेत, असे आवाहन प्राजक्ता धस यांनी केले. दूध भेसळ हा जनतेच्या आरोग्याशी संबंधित अत्यंत संवेदनशील विषय असून, दोषी कोणताही असला तरी त्याच्यावर कायद्यानुसार कठोर कारवाई झाली पाहिजे. मात्र, खोटे आरोप करून दूध भेसळीविरोधात लढणाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जनतेने ओळखावा, असेही त्यांनी म्हटले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT