गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना फसवणारी टोळी सक्रिय file photo
बीड

Matrimonial fraud : गुडघ्याला बाशिंग बांधणाऱ्यांना फसवणारी टोळी सक्रिय

अनेक तरुणांना लाखो रुपयांचा गंडा; गुन्हेही दाखल

पुढारी वृत्तसेवा

अतुल शिनगारे

धारूर ः बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात ग्रामीण भागातील अनेक तरुणांसमोर लग्नासाठी नवरी मिळणे ही मोठी समस्या बनली आहे. वयाची 35 वर्षे ओलांडली तरीही योग्य मुलगी मिळत नसल्याने अनेक नवरदेव मानसिक तणावात सापडले आहेत. विशेषतः शेतकरी, मोलमजुरी करणारे व आर्थिकदृष्ट्‌‍या दुर्बल घटकातील तरुणांना या संकटाचा मोठा फटका बसत आहे. अशा उताविळ झालेल्या तरुणांचा शोध घेत त्यांना फ सवणाऱ्या टोळ्या सक्रीय झाल्या असून यातून अनेक तरुणांना लाखोंचा गंडा घातला गेला आहे.

ग्रामीण भागात शेती करणाऱ्या, छोट्या मोठ्या व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणांचे विवाह होत नसल्याचे भयावह वास्तव पहायला मिळते. या परिस्थितीचा गैरफायदा घेत काही दलाल टोळ्या सक्रिय झाल्या असून, नवरी मिळवून देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी अल्पवयीन मुलींना पालकांची आर्थिक परिस्थिती हेरून पैसे घेऊन लग्नासाठी देण्यात येत असल्याचे प्रकार उघडकीस येत आहेत. हा प्रकार कायद्याने गुन्हा असतानाही ग्रामीण भागात तो वाढत असल्याचे चित्र आहे.

याहूनही धक्कादायक बाब म्हणजे, काही दलाल चार-पाच दिवसांसाठी लग्न लावून देतात व त्यानंतर नवरी पलायन करते. अशा प्रकारे फसवणूक झाल्यानंतर पुन्हा त्या मुलीचा दुसऱ्या नवरदेवाशी सौदा केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे नवरदेव आर्थिक व मानसिकदृष्ट्‌‍या उद्ध्वस्त होत आहेत. ग्रामीण भागातील अनेक तरुणांचे म्हणणे आहे की, शेतीवर काम करणाऱ्या किंवा मजुरी करणाऱ्या मुलांना मुली देण्यास कोणी तयार नाही. मुलींना मोठ्या शहरातील नोकरीवाले, घर असलेले, चैन-सुविधा असलेले स्थळ हवे आहे.

सामाजिक तज्ज्ञांच्या मते, वाढती बेरोजगारी, शेतीतील उत्पन्न घट, हुंडाबंदी कायद्याची अंमलबजावणी नसणे, तसेच ग्रामीण भागातील तरुणांचे शहरांकडे होणारे स्थलांतर ही या समस्येची प्रमुख कारणे आहेत. दुसरीकडे मुलींच्या शिक्षणात वाढ झाल्याने त्या आर्थिकदृष्ट्‌‍या सक्षम स्थळ शोधत असल्याचेही वास्तव आहे.या सगळ्या परिस्थितीत दलालांकडून अल्पवयीन मुलींची लग्ने लावून देणे, तसेच बनावट विवाह करून फसवणूक करणे हे प्रकार भविष्यात अधिक भयानक रूप घेण्याची शक्यता सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. यामुळे मानवी तस्करी, बालविवाह व महिलांवरील अन्याय वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

  • प्रशासनाने याबाबत गंभीर दखल घेणे आवश्यक असून, बालविवाह रोखण्यासाठी ग्रामपातळीवर समित्या सक्रिय करणे, दलालांवर कठोर कारवाई करणे, फसवणूकग्रस्त नवरदेवांसाठी तक्रार नोंदविण्याची यंत्रणा मजबूत करणे, ग्रामीण तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आज ‌‘नवरी मिळेना‌’ ही समस्या केवळ वैयक्तिक न राहता सामाजिक संकट बनत चालली असून, योग्य वेळी उपाययोजना न केल्यास भविष्यात याचे परिणाम अत्यंत गंभीर स्वरूपाचे ठरू शकतात, अस मतही जाणकारांनी दिले आहे.

  • बीड जिल्ह्यात ग्रामीण भागातील नवरदेव शेती - मजुरी करणारा वर्ग मोठा आहे यामुळे ‌‘नवरी संकट‌’ उग्र होत असल्यामुळेच अल्पवयीन मुलींच्या लग्नासाठी मुलींच्या आई-वडिलांना आर्थिक आमिष दाखवून तयार करत आहेत. यामध्ये दलालांचे जाळे सक्रिय होत असून लुटीचे प्रकार घडत आहेत. यामध्ये नवरदेवाचे तीस-पस्तीस ओलांडले तरी नवरी नाही या आकड्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे बीड जिल्ह्यातील धारूर केज वडवणी सह इतर तालुक्यात रोजगार निर्मिती नसल्याने मजुरी, शेतामध्ये काम तरुणांना करावे लागते अशा नवरदेवांना मुलगी मिळणे अशक्य झाले आहे यातून नवरदेवांना मानसिक ताणामध्ये जगत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT