Kaij Malegaon News
केज : मुलीच्या साखरपुड्याची लगबग सुरू असतानाच एका दुर्दैवी घटनेने शेख कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावून घेतला. केज तालुक्यातील माळेगाव येथे लोखंडी सावरगाव-कळंब रस्त्याच्या कामादरम्यान मुरूम टाकत असलेल्या हायवा टिप्परच्या ट्रॉलीचा ११ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाला. यावेळी परिस्थिती पाहण्यासाठी खाली उतरलेल्या चालकाला टिप्परचा स्पर्श होऊन विजेचा तीव्र धक्का बसला. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
उस्मान गबरू शेख (वय ४५, रा. दैठणा, ता. अंबाजोगाई, जि. बीड) असे मृत चालकाचे नाव आहे. ते गेल्या दहा महिन्यांपासून अंबाजोगाई येथील प्रदीप ठोंबरे यांच्या ‘यश कन्स्ट्रक्शन’ कंपनीत हायवा टिप्पर चालक म्हणून कार्यरत होते.
गुरुवारी (दि. १३) सकाळी साडेअकराच्या सुमारास उस्मान शेख हे हायवा टिप्पर क्रमांक एमएच ४४ एएफ ६२४४ मधून मुरूम घेऊन माळेगाव येथे आले होते. लोखंडी सावरगाव-कळंब रस्त्याच्या साइडपट्ट्यावर मुरूम टाकण्यासाठी त्यांनी टिप्परची ट्रॉली वर केली. त्याचवेळी ट्रॉलीचा वरून गेलेल्या ११ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहक तारेला स्पर्श झाला.
तारेला स्पर्श होताच टिप्परमध्ये वीजप्रवाह उतरला. ही घटना पाहण्यासाठी खाली उतरलेल्या उस्मान शेख यांना टिप्परचा स्पर्श होताच विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला. माहिती मिळताच युसुफवडगाव पोलिस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप मांजरमे आणि पोलिस हवालदार धनंजय कारले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
उस्मान शेख यांच्या मुलीचा विवाह केज तालुक्यातील युसुफवडगाव येथील युवकाशी ठरला होता. येत्या रविवारी (दि. १६ ऑगस्ट) तिचा साखरपुडा होणार होता, तर दिवाळीत विवाह सोहळा नियोजित होता. घरात साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्याने शेख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
उस्मान शेख यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा नववीत, तर दुसरा बारावीत शिक्षण घेत आहे. त्यांच्या दोन भावांपैकी एक रिक्षा चालवतो, तर दुसरा जेसीबी चालक आहे.
रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी ११ केव्ही उच्चदाबाच्या वीजवाहक तारा साइडपट्ट्यालगत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे होते. वीज वितरण कंपनी तसेच रस्त्याचे काम करणाऱ्या यश कन्स्ट्रक्शनकडून आवश्यक दक्षता घेतली होती का, याची चौकशी होण्याची गरज असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
घरातील कर्त्या पुरुषाचा अचानक मृत्यू झाल्याने शेख कुटुंबावर आर्थिक आणि मानसिक संकट कोसळले असून, या घटनेमुळे दैठणा आणि माळेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.