Majalgaon Minor Girls Assault
माजलगाव : छत्तीसगड राज्यातून बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी आलेल्या आदिवासी समाजातील दोन मजुरांच्या १३ व १४ वर्षीय अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. गणेश राजाभाऊ घाटूळ (किराणा दुकानदार) व अशोक भास्कर पवार (ट्रॅक्टर चालक) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यंदा बीड जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी परप्रांतीय मजुरांची मोठ्या प्रमाणावर आवक झाली आहे. छत्तीसगडमधील १४ मजुरांची एक टोळी माजलगाव तालुक्यात ऊसतोडणीसाठी दाखल झाली होती. त्यापैकी दोन मजुरांनी स्वयंपाकासाठी मदत व्हावी म्हणून आपल्या दोन अल्पवयीन मुलींनाही सोबत आणले होते. तालुक्यातील रोशनपुरी परिसरात ऊसतोडणीचे काम सुरू असून, हे मजूर मागील दोन महिन्यांपासून मुकादम उद्धव श्रीकिशन तिडके यांच्यामार्फत काम करत होते.
दि. २४ डिसेंबर रोजी मजूर ऊसतोडणीसाठी शेतात गेले असताना, झोपडीत या दोन मुली एकट्याच असल्याची संधी साधून गावातील किराणा दुकानदार व त्याचा मित्र ट्रॅक्टर चालक यांनी त्यांना बाहेर नेऊन शेतात अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर दोन्ही मुली भीतीच्या छायेत होत्या. अखेर दि. २८ डिसेंबर रोजी एका मुलीने आपल्या वडिलांना संपूर्ण प्रकार सांगितला.
यानंतर दि. २९ डिसेंबर रोजी मुलीच्या वडिलांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहेत.