Majalgaon Annatyag Andolan
माजलगाव : शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजलगांव तालुक्यातील वांगी बु येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी (दि. २२) सकाळी १० वाजता ‘एक गाव अन्नत्याग आंदोलन’ सुरू करण्यात आले. या आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. यावेळी शेतकऱ्यांनी कर्जमाफी व पिकविम्याच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी करत शासनाकडे तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली.
आंदोलनाच्या प्रमुख मागण्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही सरसकट सर्व शेतकऱ्यांना लागू करण्यात यावी, मुख्यमंत्री यांनी जाहीर केल्यानुसार बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १७ हजार ५०० रुपये पिकविमा सरसकट मंजूर करण्यात यावा, तसेच खरीप हंगाम २०२६ च्या पीकविमा योजनेत पूर्वीप्रमाणे "चार ट्रिगरचा समावेश' करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
दि. २२ जून रोजी सकाळी १० वाजता आंदोलनास सुरुवात झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
राज्यातील शेतकरी सध्या आर्थिक संकटातून जात असून अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती आणि उत्पादन खर्चात झालेली वाढ यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कर्जमाफी व पिकविमा संदर्भातील मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
आंदोलनात सहभागी शेतकऱ्यांनी शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य न केल्यास आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला. या आंदोलनामुळे परिसरात शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.