बीड : जिल्ह्यात गॅस काळ्या बाजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पेठ बीड पोलिस स्टेशन हद्दीतील इमामपूर रोडवरील शिवनेरी नगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री वाजता छापा टाकला असता 29 वेगवेगळ्या कंपनीच्या (इंडेन, भारत गॅस, एचपी) टाक्या आढळल्या. यापैकी 12 व्यावसायिक वापराच्या सिलिंडरांपैकी 1 भरलेला आणि 17 घरगुती सिलिंडरांपैकी 8 भरलेले सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी तब्बल 73 हजार 550 रुपयांच्या सिलिंडर जप्त केले आहेत.
बीड शहरातील इमामपूर रोडवरील शिवनेरी नगर भागात घरगुती गॅसचा अवैध साठा केला असल्याची माहिती पेठ बीड पोलिस व महसूलच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास पोलिस आणि पुरवठा विभागाने संयुक्त कारवाई केली. यामध्ये घरगुती वापराचे 17 सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणात पेठ बीड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेठ बीड पोलिस स्टेशनचे एपीआय नित्यानंद उबाळे यांच्या नेतृत्वाखालील हेड कॉन्स्टेबल नितीन राठोड, पोलिस अंमलदार कल्याण जाधव, अंकुश राठोड, होमगार्ड पठाण ही कारवाई केली. पुरवठा अधिकारी शिवकुमार स्वामी व तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार प्रशांत सुपेकर, कारकून श्रीराम वायभट व संतोष मुळीक उपस्थित होते.
प्राथमिक तपासात सिलिंडर अनधिकृतपणे भरले गेले असल्याचे निदर्शनास आले असून, लाखो रुपयांचे व्यवहार होत असल्याचा संशय आहे. दरम्यान, घरगुती वापराच्या सिलिंडरचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात असेल तर त्याबाबतची माहिती कळवावी, असे आवाहन तालुका पुरवठा अधिकारी प्रशांत सुपेकर यांनी केले आहे.