Beed Limbaganesh Crop Loan Protest Pudhari
बीड

Beed Farmer Protest | पीक कर्जासाठी लिंबागणेशमध्ये रास्ता रोको; सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी

जामीनदाराच्या थकीत कर्जामुळे पीक कर्ज नाकारल्याचा महाराष्ट्र ग्रामीण बँकेवर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Beed Limbaganesh Crop Loan Protest

नेकनूर : दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यात अडथळे येत असल्याच्या निषेधार्थ गुरुवारी सकाळी बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. जामीनदाराच्या खात्यावरील थकबाकी तसेच वैयक्तिक कर्जाच्या थकबाकीचे कारण देत महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेकडून पीक कर्जाच्या अर्जांवर पुढील कार्यवाही केली जात नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. पात्र शेतकऱ्यांना पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे आणि सक्तीची कर्जवसुली थांबवावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सामाजिक कार्यकर्ते तथा बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्याचे मुख्य प्रचारप्रमुख डॉ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

जामीनदाराच्या थकबाकीमुळे पीक कर्जात अडथळे

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या लिंबागणेश शाखेत पीक कर्जासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना वैयक्तिक कर्जाची थकबाकी किंवा जामीनदाराच्या खात्यावरील थकीत देयकांमुळे अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. संबंधित कर्जखाती नियमित करून अद्ययावत केल्यानंतरच पीक कर्जाच्या अर्जांवर पुढील प्रक्रिया करता येईल, अशी भूमिका बँकेकडून घेतली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असून पेरणी, खते, बियाणे आणि अन्य शेतीविषयक खर्च भागविण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत पीक कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक पिळवणूक होत असल्याचे डॉ. गणेश ढवळे यांनी नमूद केले.

जामीनदार असलेल्या शेतकऱ्यांना अन्य कर्जखात्यांवरील थकबाकीच्या कारणावरून पीक कर्ज नाकारण्याबाबतच्या अटी शिथिल कराव्यात. तसेच पात्र शेतकऱ्यांच्या कर्जप्रक्रियेतील अडचणी दूर करून त्यांना वेळेत पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालण्याची मागणी

दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले असताना बँका, मायक्रोफायनान्स कंपन्या, फायनान्स कंपन्या आणि खासगी सावकारांकडून कर्जवसुलीसाठी तगादा लावला जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सक्तीच्या कर्जवसुलीला आळा घालावा आणि नियमबाह्य वसुली करणाऱ्यांवर कारवाई करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT