मृत सुमित गवते pudhari photo
बीड

Beed Crime : आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले; तरुणाची भोसकून हत्या

बीडमध्ये हेलिपॅडच्या जागेवर रक्तरंजीत थरार होमगार्डसह चौघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

बीड : मोबाईलमधील आक्षेपार्ह फोटोच्या कारणावरून मित्रांनीच एका 19 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरूर कासार तालुक्यातील लिंबा येथे घडली. सुमित गवते, असे मृत तरुणाचे नाव असून, या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात एका होमगार्डसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हेलिपॅडच्या मोकळ्या जागेत हा रक्तरंजित थरार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुमित गवते (19, रा. बेलुरा, जि. बीड) याने आरोपी रितेश बहीर याच्याशी संबंधित काही आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले होते. यावरून त्यांच्यात वाद होता. रविवारी रात्री रुस्तुम गवते, ज्ञानेश्वर लाटे आणि सूरज नागरगोजे यांनी सुमितला पकडून धरले, तर रितेश बहीर याने सुमितच्या पोटात चाकूने सपासप वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितचा अतिरक्तस्रावामुळे जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी शहादेव गवते यांच्या फिर्यादीवरून रितेश सतीश बहीर, रुस्तुम गोवर्धन गवते, ज्ञानेश्वर दत्ता लाटे (तिघे रा. बेलुरा) आणि सूरज मच्छिंद्र नागरगोजे (रा. लिंबा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

एका आरोपीला ग््राामस्थांनी पकडले

घटनेनंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ज्ञानेश्वर लाटे याला स्थानिक ग््राामस्थांनी धाडसाने पकडून ठेवले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र मुख्य आरोपी रितेश बहीर याच्यासह अन्य दोघे अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले आहेत. विशेष म्हणजे, आरोपींपैकी रितेश बहीर हा होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT