Beed agriculture news pudhari photo
बीड

Beed rainfall shortage : आभाळाने फिरवली पाठ अन् मातीने गिळले स्वप्न

ऊन-सावलीचा खेळ, सोसाट्याचा वारा; पावसाअभावी बीड जिल्ह्यात खरीप करपू लागले

पुढारी वृत्तसेवा

केज : "ढग आले दारी, पण बरसले नाहीत; मातीत रुजलेली स्वप्नं, उन्हाने जाळून टाकली..." यंदाचा खरीप हंगाम बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा वेदनादायी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जूनअखेरीस झालेल्या रिमझिम पावसावर विश्वास ठेवत कर्ज काढून, उसनवारी करून आणि व्याजाने पैसे उभे करून बळीराजाने पेरणी पूर्ण केली. मात्र गेल्या आठ-दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने आता उगवलेली पिके डोळ्यांसमोर करपू लागली आहेत. आकाशात ढगांची ये-जा, कडक ऊन, मध्येच सावली आणि सोसाट्याचा वारा या लहरी वातावरणामुळे जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे.

टाकरवणसह केज, गेवराई, धारूर, वडवणी, माजलगाव, अंबाजोगाई आणि जिल्ह्यातील अनेक भागांत खरिपाच्या पेरण्या मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाल्या आहेत. काही ठिकाणी सुमारे ५० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असली, तरी पावसाअभावी उगवलेली सोयाबीन, मूग, उडीद, कापूस आणि तूर ही पिके कोमेजून करपू लागली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

गेल्या चार वर्षांपासून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, तर कधी अवकाळी पावसाच्या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकऱ्यांना यंदा तरी समाधानकारक हंगामाची अपेक्षा होती. हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी शेतीची मशागत पूर्ण केली. रिमझिम पावसाने आशेचा किरण दाखवला.

मात्र त्यानंतर आभाळाने पाठ फिरवल्याने आता मातीत रुजलेली स्वप्ने उन्हात करपत आहेत.कर्जाचे हप्ते, बियाणे, खत, औषधे आणि मशागतीचा वाढता खर्च यामुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली तर त्यांची अवस्था अधिक बिकट होणार आहे. अनेकांनी सावकारांकडून व्याजाने पैसे घेतले असून, आता पुन्हा बियाणे आणि खतासाठी पैसा कुठून आणायचा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.

रसशोषक किडींचा वाढता प्रादुर्भाव

पावसाअभावी वातावरणात वाढलेल्या उष्णतेमुळे खरीप पिकावर रसशोषक किडींचा प्रादुर्भावही वाढू लागला आहे. त्यामुळे आधीच कोमेजलेल्या पिकांचे नुकसान आणखी वाढण्याची भीती कृषी क्षेत्रात व्यक्त होत आहे. शेतकरी औषध फवारणीचा खर्च करावा की पावसाची वाट पाहावी, या संभ्रमात आहेत.

नदी-नाले कोरडे; वीज पुरवठा विस्कळीत

जून महिना संपून जुलैचा मध्य आला, तरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस झालेला नाही. परिणामी नदी-नाले, ओढे आणि शेततळी कोरडीच आहेत. दुसरीकडे ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्यानेही पिकांना जीवदान देणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे संकट अधिक गडद होत आहे.

या आठवड्यात पाऊस नाही तर दुबार पेरणी अटळ

कृषी जाणकारांच्या मते, येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील अनेक भागांत दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात मोठी भर पडणार असून, प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

शेतकऱ्याचा प्रश्न केवळ पावसाचा नाही, अस्तित्वाचा आहे

जिल्ह्यातील बळीराजाने यंदाच्या खरिपासाठी घरातील दागिने गहाण ठेवले, उसनवारी केली, व्याजाने पैसे आणले आणि मोठ्या आशेने बी पेरले. आज तेच बी पावसाअभावी करपू लागले आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर त्याच्याकडे ना पैसा उरेल, ना धीर. चार वर्षांपासून निसर्गाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्याला आता केवळ पावसाची नाही, तर जगण्याची आस लागली आहे. आभाळाने साथ दिली नाही, तर यंदाचा खरीप हंगाम हजारो शेतकरी कुटुंबांसाठी आर्थिक आणि मानसिक संकटाचा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT