Gambling raid in Kej
केज : केज शहरातील मटका व्यवसायावर सहाय्यक पोलीस अधीक्षक व्यंकटराम यांच्या पथकाने कारवाई करत मोठी धाड टाकली. या कारवाईत ‘मटका किंग’ म्हणून ओळखले जाणारे गणेश खराडे व शेख चाँद यांच्यासह एकूण पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कारवाईदरम्यान 21 हजार 350 रुपये रोख रक्कम, तीन मोबाईल फोन, मोटारसायकल आणि जुगार साहित्य असा एकूण 1,06,350 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अवैध मटका व्यवसायावर अंकुश ठेवण्यासाठी एएसपी व्यंकटराम यांनी 13 नोव्हेंबर रोजी त्यांच्या पथकाला विशेष कारवाईचे आदेश दिले होते. आदेशानुसार दोन पोलिस पथके तयार करण्यात आली. मंगळवार पेठ तसेच वसुंधरा बँकेच्या पाठीमागे दोन ठिकाणी एकाचवेळी धाड टाकण्यात आली. या धाडीत शिवराज भगवान पाटील, महेमूद शेख आणि उत्तम विश्वनाथ वाघमारे यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान तिघेही कमिशनवर मटका खेळवित असल्याचे आणि जमा झालेली रक्कम गणेश खराडे व शेख चाँद यांच्याकडे देत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पाचही आरोपींवर केज पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.
या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक सुकुमार उर्फ राकेश बनसोडे, संजय फड, खेलबुडे, खंदारे, केदार, नागरगोजे आणि संतोष गित्ते यांचा समावेश असलेल्या पथकाने सहभाग घेतला.