Vilas Ghule Murder Case 
बीड

Vilas Ghule Murder Case | विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे; एसआयटीकडून वर्ग

केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांचा २१ जूनरोजी उपचारादरम्यान मृत्यू

पुढारी वृत्तसेवा

Kaij Vilas Ghule Murder Case

केज : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले खून प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.

दि. २० जून रोजी केज-बीड मार्गावरील टाकळी फाट्याजवळील ‘हॉटेल गावकरी’ येथे ही घटना घडली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल चालक विलास घुले यांचा मित्र उमेश माने याच्यावर एका विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी उमेश माने याला मारहाण केली. या वेळी जमावाच्या तावडीतून उमेश माने याला वाचविण्याच्या प्रयत्नात विलास घुले यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या घुले यांचा २१ जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या घटनेनंतर जिल्ह्यात तीव्र पडसाद उमटले होते. रस्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार आयपीएस अधिकारी व्यंकटराम यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीमार्फत तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान पथकाने या प्रकरणातील दहा आरोपींना अटक केली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

दरम्यान, मयत विलास घुले यांचे बंधू तथा फिर्यादी रमेश घुले यांनी पुरवणी जबाबात खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरव सोनवणे, त्यांचे स्वीय सहाय्यक तसेच टाकळी येथील श्रीकांत घुले यांच्या सहभागाबाबत संशय व्यक्त केला आहे.

आता या संवेदनशील प्रकरणाचा पुढील तपास एसआयटीकडून सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समोर आली असून, पुढील तपास सीआयडीमार्फत केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT