Kaij Teacher Recruitment Irregularities
केज : तालुक्यातील लव्हुरी येथील श्री बडेबाबा विद्यामंदिरातील शिक्षक भरतीतील कथित अनियमितता आणि संचमान्यता मिळविण्यासाठी बाहेरील विद्यार्थी आणून शासनाची व शिक्षण विभागाची फसवणूक केल्याच्या आरोपांची चौकशी करावी, या मागणीसाठी सरपंच पंडित ऊर्फ मुन्ना वसंतराव चाळक यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. २७ ऑक्टोबरपासून सुरू असलेल्या या उपोषणाचा तिसरा दिवस असून, संबंधित प्रकरणात कारवाई होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उपोषणकर्ते चाळक यांनी दिलेल्या निवेदनानुसार, या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ९ जुलै २०२६ रोजी आठ आठवड्यांच्या आत चौकशी करून आवश्यक कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. तसेच शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी १४ नोव्हेंबर २०२५ आणि २१ जानेवारी २०२६ रोजी लेखी आश्वासने दिल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही संबंधित प्रकरणाची चौकशी करून कार्यवाही करण्यात आलेली नाही, असा आरोप चाळक यांनी केला आहे.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, यासाठी ग्रामस्थांनी २१ जानेवारी, ११ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबर २०२६ रोजी निवेदने दिल्याचे उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शिक्षक भरतीतील कथित अनियमितता, संचमान्यतेसाठी बाहेरील विद्यार्थ्यांचा वापर केल्याचा आरोप आणि न्यायालयाच्या आदेशानुसार झालेल्या कार्यवाहीबाबत आता शिक्षण विभागाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.