Kej Taluka Sangvi Temple Theft
केज : केज तालुक्यातील सांगवी (सारणी) येथील बिनगीर बाबा मंदिरातील दानपेटी चोरीला गेल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणी मंदिराचे पुजारी आणि त्यांच्या मुलावर ग्रामस्थांनी संशय व्यक्त केला आहे.
माहितीनुसार, १८ मार्च रोजी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी किसन दिनुबुवा गिरी व त्यांचा मुलगा गणेश गिरी हे पोत्यात काही वस्तू घेऊन जात असल्याचे काही ग्रामस्थांनी पाहिले. यामध्ये अप्पासाहेब धस, राम केदार आणि अनिकेत केदार हे दर्शनासाठी मंदिरात गेले असताना त्यांनी हा प्रकार पाहिल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या घटनेबाबत गावातील सरपंच लक्ष्मी केदार, दत्तात्रय धस, सुमंत धस आणि संजय केदार यांच्यासह सुमारे २५ ग्रामस्थांनी २२ मार्च रोजी केज पोलीस ठाण्यात निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ११ ते १८ मार्च दरम्यान बिनगीर बाबा यांचे शिष्य वैकुंठवासी वैराग्यभूषण माने बाबा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला होता. या काळात भाविकांनी दानपेटीत रोख रक्कम तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले होते.
ग्रामसभेत या निधीतून मंदिरालगत किचन शेड उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच मागील वर्षी दानपेटी उघडल्यावर सुमारे ६० ते ७० हजार रुपयांची रक्कम जमा झाल्याची माहितीही ग्रामस्थांनी दिली आहे.
याच पार्श्वभूमीवर १९ मार्च रोजी ग्रामसभा बोलावण्यात आली होती. मात्र, पुजारी किसन गिरी व त्यांचा मुलगा गणेश गिरी यांना उपस्थित राहण्यास सांगूनही त्यांनी ग्रामसभेला हजेरी लावली नाही. तसेच “माझा जावई पोलीस आहे” असे सांगत येण्यास नकार दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मुलीला भेटायला लातूरला जात असलेल्या एका महिलेचा गळ्यातील मिनी गंठण केज येथील बस स्टँडवरून चोरीला गेले आहे. दि. १९ मार्च रोजी दुपारी केज शहरातील मंजुश्री जगदाळे या लातूर येथील शिक्षण घेत असलेल्या मुलीला भेटायला जाण्यासाठी केज येथील बस स्टँडवर थांबलेल्या असताना अज्ञात चोरट्यांनी गर्दीचा गैरफायदा घेऊन त्यांच्या गळ्यातील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मिनी गंठण तोडून घेऊन फरार झाला आहे.
या प्रकरणी मंजुश्री जगदाळे यांनी केज पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. या प्रकरणी पोलिस या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासून त्या गंठण चोराचा तपास करीत आहेत.