केज : कळमअंबा (ता. केज) येथील प्रियंका हनुमंत इंगळे (Priyanka Ingale) हिची खो-खो भारतीय संघाच्या कर्णधारपदी नुकतीच निवड झाली आहे. १३ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या खो - खो वर्ल्डकप स्पर्धेत प्रियंका कर्णधार पदाची धुरा सांभाळणार आहे. तिच्या निवडीमुळे बीड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
प्रियंकाचे वडील हनुमंत इंगळे नोकरी निमित्ताने मागील अनेक वर्षांपासून पुण्याला स्थायिक आहेत. त्यामुळे प्रियंकाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पुणे येथील इंद्रायणी विद्यालयात झाले. तिने वयाच्या १४ व्या वर्षी पुण्यातील राजमाता क्रीडा मंडळात खो - खो खेळाच्या प्रशिक्षणास सुरुवात केली. तिने शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील खो- खो स्पर्धेत नैपुण्य दाखविले. अंगी असलेल्या कौशल्यामुळे तिला महाराष्ट्र खो- खो संघाच्या कर्णधार पदाचा मान तीन वेळा मिळाला होता. (Indian Kho Kho Team)
आता तिची खो - खो भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. दिल्ली येथे १३ जानेवारीपासून होत असलेल्या खो खो वल्डकप स्पर्धेसाठी ती भारतीय संघाची धुरा सांभाळणार आहे. या स्पर्धेत २१ देशाचे संघ सहभागी होणार आहेत. पहिला सामना भारत विरुद्ध पाकिस्तान संघात होणार आहे. (Indian Kho Kho Team)
प्रियंकाने राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर क्रीडा पुरस्कार मिळविला आहे. तिला २०२३ - २४ चा छत्रपती शिवाजी क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. तिला राजमाता जिजाऊ क्रीडा मंडळाचे प्रशिक्षक अविनाश करवंदे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तिच्या यशाबद्दल तालुक्यातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
केज शहरातील कविता पाटील हिची भारतीय महिला क्रिकेट 'अ' संघात निवड झाली होती. तर डोणगाव येथील ज्योतीराम घुले हा भारतीय दिव्यांग क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आता प्रियंकाच्या निवडीमुळे केज सारख्या ग्रामीण भागातील खेळाडू जागतिक स्तरावर आपला दबदबा निर्माण करीत आहेत. मात्र, तालुक्यात खेळाडूंसाठी मैदान, प्रशिक्षण व इतर सुविधा उपलब्ध नसल्याने अनेक खेळाडू जागतिक स्तरापासून वंचित राहिले आहेत. (Indian Kho Kho Team)