Beed Kej law and order
गौतम बचुटे
केज : विघ्नहर्ता श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर केज पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला आहे. शहरातील चौका चौकात बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासोबतच आता ड्रोन, वॉच टॉवर आणि टोईंग व्हॅनचा उपयोग करण्यात येत आहे.
केज शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत गडबड गोंधळ करण्यावर केज पोलिसांनी कडक नजर ठेवली आहे. त्यासाठी पोलिस, दंगल नियंत्रक पथकाचे सुसज्ज हत्यारी जवान आणि गृह रक्षक दलाचे जवान हे लक्ष ठेवून आहेत. शहरातील चौकात आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८-सी, ५४८-डी वर बसविलेल्या सीसीटीव्ही सोबतच आता मिरवणुकीत ड्रोन द्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. तीन ठिकाणी १५ फूट उंचीचे वॉच टॉवर उभारले आहेत. या वॉच टॉवर वर शस्त्रसज्ज पोलिस असून असामाजिक तत्वावर डोळ्यात तेल घालून पहारा देत आहेत. तर मिवणुकी दरम्यान रहदारी आणि मिरवणुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या क्षेत्रात वाहन पार्क केली असतील, त्यावर कारवाई करण्यासाठी टोईंग व्हॅन सोबतीला आहेत.
गणेश भक्तांनी श्री गणेशाला निरोप देताना कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवून सण उत्सवाचा आनंद घ्यावा. मात्र जर कोणी गडबड गोंधळ करून अशांतता निर्माण करीत असेल तर त्याला नागरिकांनी पोलिसांच्या स्वाधीन करावे. अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल.- स्वप्नील उनवणे, पोलिस निरीक्षक, केज