Kej Taluka Minor Girl Assault Case
केज : केज तालुक्यात अत्यंत खळबळजनक घटना घडली असून सख्या चुलत चुलत्याने अल्पवयीन पुतणीवर लैंगिक अत्याचार केला. त्या नंतर चक्क त्या मुलीच्या चुलतीने कुणाला ही घटना सांगू नको म्हणून जीवे मारण्याची धमकी दिल्याने घाबरून गेलेल्या त्या अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले. त्या नंतर उपचारा दरम्यान रात्री त्या कोवळ्या अभागी मुलीचा मृत्यू झाला आहे.
केज तालुक्यातील एका गावात माणुसकीला आणि नात्याला काळीमा फासणारी अत्यंत निंदनीय घटना घडली आहे. एका सोळा वर्षाची अल्पवयीन मुलगी ही दि. ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७:०० च्या सुमारास गावातील घराच्या पाठीमागे असलेल्या गायीच्या गोठ्यातून घरी जात असताना तिच्या वडिलांच्या चुलत भावाने म्हणजे नात्याने तिचा चुलत चुलता असलेल्या एका विवाहित नराधमाने तिला अडवून तिथे असलेल्या बाजेवर तिच्या सोबत कुकर्म करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
त्या नंतर ती अल्पवयीन मुलगी घाबरून गेली. आता ती ही घटना तिच्या घरी सांगेल म्हणून नराधम चुलत्याच्या बायकोने तिच्या मुलीसमान असलेल्या अल्पवयीन मुलीला, ही घटना जर कुणाला सांगितली तर जीवे मारून टाकण्याची धमकी दिली.
या झालेल्या अत्याचाराने आणि त्यांच्या धमकीमुळे ती अत्याचारित अल्पवयीन मुलीने विष प्राशन केले. त्या नंतर तिला संभाजीनगर येथे उपचारासाठी भरती करण्यात आले होते. शुक्रवार (दि. १०) मध्यरात्री १२:३० वाजता त्या पीडित मुलीचे उपचारा दरम्यान निधन झाले आहे. या प्रकरणी दि.९ एप्रिल रोजी नराधम चुलता आणि त्याची पत्नी या दोघांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मध्यरात्री मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त होताच पिंक पथकाचे पोलिस उपनिरीक्षक प्रकाश शेळके हे संभाजी नगरला रवाना झाले आहेत.
त्या अभागी मुलीचे प्रेत संभाजी नगर येथे असून त्याच्यावर शवविच्छेदन झाल्या नंतर तिचे प्रेत तिच्या गावी आल्या नंतर आज रात्री तिच्यावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.
गुन्हा दाखल होताच केज पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याला केज येथील न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याला १५ एप्रिलपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.