Kej Manjara river villages alert
गौतम बचुटे
केज : मांजरा प्रकल्प आज (दि. १६) दुपारी १२ वाजेपर्यंत तब्बल ८७ टक्के क्षमतेने भरला आहे. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरण कोणत्याही क्षणी पूर्ण क्षमतेने भरून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी धरण प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून कोणत्याही क्षणी धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे.
धरणातील पाण्याची आवक सतत वाढत असल्यामुळे विसर्ग कमी-जास्त करण्याची कार्यवाही परिस्थितीनुसार करण्यात येणार आहे. यामुळे मांजरा नदीपात्रातील आणि नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये तसेच धरण क्षेत्रातून सुरू होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे पूरस्थिती निर्माण होऊ शकते, याची दक्षता घ्यावी. कोणतीही जीवितहानी अथवा वित्तहानी होणार नाही, यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
केज तालुक्यातील मांजरा नदी काठच्या भागातील दहीटना, राजेगाव, बोरगाव, हदगाव, डोका, लाखा आणि भोपला या भागातील नदीकाठची पिके पूर्णतः पाण्यात बुडालेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तहसीलदार राकेश गिड्डे यांनी मांजरा नदीकाठच्या सर्व गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे.